आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअचलपूर नगर परिषद कार्यालयाच्या परतवाडा येथील प्रशासकीय कार्यालयाच्या परिसरात बेशिस्तपणे वाहनांची पार्किंग केली जात आहे. जे कार्यालय अचलपूर व परतवाडा या जुळ्या शहराच्या प्रशासकीय कामांचा डोलारा सांभाळते, त्याच कार्यालयाच्या परिसरात पार्किंगचे नियम पाळले जात नसतील, तर त्यापासून शहरातील सर्वसामान्य नागरिकांनी काय आदर्श घ्यावा, असा प्रश्न येथील प्रशासकीय कार्यालय परिसरतील बेशिस्त पार्किंग व्यवस्थेकडे पाहून सामान्य नागरिकांना पडत आहे.
शहरात एकीकडे पोलिस प्रशासनाने पुढाकार घेवून शहराची वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याचा प्रयत्न चालविला असताना पालिका प्रशासन मात्र स्वत:च्या कार्यालय परिसरातच या नियमाचे उल्लंघन करत असल्याचे दिसून येत आहे. पालिका प्रशासकीय कार्यालयासमोर वाटेल त्या पध्दतीने चारचाकी वाहने उभी केली जात आहेत. त्यामुळे पालिकेचे प्रशासकीय कार्यालय कुठे हरविले तर नाही ना, असा प्रश्न निर्माण सर्वसामान्यांना पडला आहे. कार्यालय परिसरात उभ्या असलेल्या चार चाकी वाहनांकडे पाहून हे एखादे चारचाकी वाहनांचे शोरूम तर नाही ना, असा प्रश्नही येथे कामानिमित्त येणारे सर्वसामान्य एकमेकांना विचारताना दिसतात.
पालिका प्रशासक व मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यकाळात अस्थायी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून प्रवेशद्वारापासून हे कर्मचारी कार्यरत असतात. मात्र पार्किंगबाबत कुठलेच नियम पाळल्या जात नाहीत. कार्यालयाच्या परिसरात बाहेरील व्यक्ती राजरोसपणे वाहन उभे करून बिनधास्त बाहेर निघून जातात. एवढेच काय, तर पालिकेत येणारे कर्मचारी सुध्दा मुख्याधिकाऱ्यांच्या कक्षासमोरच वाहने ठेवून मोकळे होतात. या बेशिस्त वाहनांवर कुठलीच कारवाई केली जात नसल्याने पालिकेने इतरांना पार्किंगचे नियम सांगताना अडचण निर्माण होत असेल म्हणून कदाचित शहरातील पार्किंग झोन निर्माण करण्यासाठी पालिका दिरंगाई करत आहे.
शहरात बेशिस्त वाहने ठिकठिकाणी लावली जात असताना पोलिस विभाग केवळ कारवाई करत आहे. पालिका प्रशासन मात्र बघ्याची भूमिका घेताना दिसत असल्याने नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
अचलपूर पालिका प्रशासकीय कार्यालय परिसरातील पार्किंगबाबत कर्मचारी नियुक्त करण्यात आलेला आहे. बेशिस्त पार्किंग करणाऱ्या वाहनांसह कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी पालिका परिसरात खाजगी वाहने उभी करू नये.
- अमोल दहीकर, प्रशासकीय अधिकारी, न. प., अचलपूर
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.