आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:तिरंगा माझा ग्रुपतर्फे जिल्ह्यात राबवणार उपक्रम; सर्व थोर महापुरुषांच्या स्मारकांचा जलाभिषेक होणार

अमरावती14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त तिरंगा माझा ग्रुपच्या वतीने ७ ऑगस्ट रोजी तिरंगा कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या कावड यात्रेची सुरुवात कुरळपूर्णा ( चांदूर बाजार) येथून पूर्णा नदीचे पाणी घेऊन शेकडो युवक तिरंगा हातात घेऊन निघणार आहे. देश भक्तिमय वातावरणात निघणाऱ्या कावड यात्रेदरम्यान अमरावती शहरातील सर्व थोर महापुरुषांच्या स्मारकांचे जलाभिषेक करण्यात येणार आहे. त्यानंतर नेहरू मैदान येथे यात्रेचा समारोप होणार असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष संदीप रोंघे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

देशाला स्वातंत्र्य मिळवून ७५ वर्षे पूर्ण होत आहे. हे वर्ष आझादी का अमृत महोत्सव म्हणून हर घर तिरंगा उपक्रम साजरा करणार आहेत. यंदाही तिरंगा माझा ग्रुपच्या वतीने ७ ऑगस्ट सकाळी ७ वाजता चांदूर बाजार तालुक्यातील कुरळपूर्णा गावातील नदीचे जल घेऊन अमरावतीकडे मार्गक्रमण करणार आहे. या यात्रेचे उद्घाटन माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर ही तिरंगा कावड यात्रा कठोरा बुजरुग मार्गे पोटे शिक्षण संस्था प्रवेशद्वारापुढे आल्यानंतर आ. प्रवीण पोटे यांच्यासह नागरिकांकडून यात्रेचे स्वागत होणार आहे. त्यानंतर यात्रेचे स्वागत व भारतमातेचे पूजन आमदार सुलभा खोडके यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

तसेच गाडगे नगर येथील गाडगेबाबा यांच्या समाधीचे जलभिषेक, त्याच सोबत पंचवटी चौक येथील माजी कृषिमंत्री डॉ. भाऊसाहेब उपाख्य पंजाबराव देशमुख यांच्या स्मारकाचे जलभिषेक, त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथील महामानवांचे स्मारक, शहीद स्मारक, जयस्तंभ चौकातील महात्मा गांधी पुतळा, चित्रा चौक येथील महात्मा ज्योतिबा फुले, प्रताप चौकातील वीर महाराणा प्रताप, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, राष्ट्रमाता जिजाऊ या सर्वांच्या स्मारकांचा जलभिषेक करण्यात येणार आहे. या यात्रेचा समारोप ५.३०वाजता नेहरू मैदान येथे होणार आहे.

याला माजी मंत्री बच्चू कडू, भाजप शहराध्यक्ष किरण पातूरकर यांची उपस्थिती राहणार आहे. या तिरंगा कावड यात्रेत विद्यार्थी, नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने सहभागी व्हावे,असे आवाहन तिरंगा माझा सेवाभावी संस्थेने पत्रपरिषदेतून केले आहे. यावेळी संदीप रोंघे, नरेंद्र देशमुख, नीलेश चौधरी, अजय शृंगारे, गोपाल भेंडे, गगन पारेकर, संजय जाधव, अजय खरड, शैलेश जवंजाळ, जितू गुजर, महेश तराळ, शेषनाग गजभिये, निखिल देवघर, ऋषील बघणे, गौरव पडोळे, तुषार पडोळे, आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...