आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वीज कनेक्शन:जुन्या घराच्या खरेदीनंतर आता आपोआप वीज कनेक्शन नव्या मालकाच्या नावावर

अमरावती2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आता जुन्या घर किंवा दुकानाच्या खरेदीनंतर आपोआप वीज कनेक्शन नव्या मालकाच्या नावावर होणार आहे. यासाठी ग्राहकांची धावपळ बंद होऊन आपोआप कनेक्शन धारकाच्या नावात बदल होण्यासाठी महावितरणने माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून नवीन व्यवस्था नुकतीच सुरू केली आहे. उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘ईज ऑफ लिव्हिंग’च्या सूचनेनुसार हा उपक्रम यशस्वीपणे राबवल्याबद्दल महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.

एखाद्याने जुने घर किंवा दुकान खरेदी केले आणि त्यानुसार मुद्रांक शुल्क भरून संबंधित विभागाकडे नोंदणी केली की, त्यानंतर त्या घराचे किंवा दुकानाचे वीज कनेक्शन जुन्या मालकाकडून नव्या मालकाला आपल्या नावावर करून घेण्यासाठी स्वतंत्र अर्ज करावा लागत होता. या बदलासाठी महावितरणकडे अर्ज व सोबत कागदपत्रे दाखल करून प्रक्रिया शुल्क भरल्यानंतर कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून पडताळणी केली जात असे. महावितरणने यासाठी ऑनलाइन सुविधाही उपलब्ध केली आहे. त्यानुसार ऑनलाइन अर्ज भरून संबंधित कागदपत्रे अपलोड करावी लागायची. परंतु, या प्रक्रियेत कागदपत्रांच्या पडताळणी वेळ जात होता. ग्राहकांना अनेकदा पाठपुरावा करावा लागत होता.

एकापेक्षा अधिक व्यक्तींच्या नावे घराची खरेदी झाली असेल तर त्यांच्याशी संपर्क साधून कोणाच्या नावे वीज कनेक्शन परिवर्तित करायचे याची निवड करण्यास सांगितले जाते. कारण विजेचे कनेक्शन एकच व्यक्ती किंवा संस्थेच्या नावे असू शकते. नव्या प्रक्रियेत वीज कनेक्शन नावावर होण्यासाठी स्वतंत्र अर्ज करणे, कागदपत्रे दाखल करणे, पडताळणी करणे व पाठपुरावा करणे हे सर्व कमी झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. नवीन व्यवस्थेची चाचणी नुकतीच यशस्वी झाली आहे.

मुद्रांक शुल्क, नोंदणी विभागाशी आयटी सिस्टम जोडली असते : नव्या व्यवस्थेनुसार मुद्रांक शुल्क व नोंदणी विभागाशी महावितरणची आयटी सिस्टिम जोडली आहे. नोंदणी विभागात नव्या मालकाच्या नावाची प्रक्रिया पूर्ण झाली की, महावितरणला संदेश पाठविला जातो, त्यानुसार महावितरणकडून संबंधित ग्राहकाला एसएमएस पाठविला जातो व आवश्यक प्रक्रिया शुल्क भरण्यास कळवले जाते. हे शुल्क ग्राहक घरात बसून ऑनलाइनही भरू शकतो. शुल्क भरले की, वीज कनेक्शन नावावर होते आणि पुढच्या महिन्याचे विजेचे बिल नव्या मालकाच्या नावाने पाठविले जाते.

प्रकल्प पूर्ण, ग्राहकांनी घ्यावा लाभ
पंतप्रधानांचा‘ईज ऑफ लिव्हिंग’चा संदेश आहे. त्यानुसार योजना राबवण्याची सूचना उपमुख्यमंत्र्यांनी केली होती. अशा प्रकारे ग्राहकांना वीज कनेक्शन आपोआप बदलून मिळवण्यासाठीच्या प्रकल्पाचे काम ऑक्टोबर महिन्यात सुरू झाले. आता हा प्रकल्प पूर्ण झाला असून आता ग्राहकांना या नवीन सेवेचा लाभ घेता येणार असल्याचे सिंघल यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...