आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामागील काही दिवसांपासून कधी थंडीचा कडाका, दाट धुके, तर कधी ढगाळ वातावरण असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. ढगाळ वातावरणामुळे रब्बी हंगामातील गहू, हरभरा पिकांवर विविध किडींचा प्रादुर्भाव वाढत असल्याने उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. किडीच्या बंदोबस्तासाठी पुन्हा शेतकरी महागड्या औषधांची फवारणी करत असल्याचे चित्र आहे. तसेच खरीप हंगामातील तुरीचे पीक सध्या सोंगणीला आले असून, तालुक्यातील ग्रामीण भागात काही ठिकाणी तुरीची सोंगणी सुरू आहे. त्यामुळे गत दोन दिवसांपासून असलेल्या ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. तसेच सध्या रब्बी हंगामातील हरभरा, गहू पिके बहरली असून, हरभऱ्याचे पीक फुलधारणा अवस्थेत आहे, तर काही घाट्यावर असून, वातावरणातील बदलांमुळे पिकांवर अळ्यांचा व रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे यंदा गहू, हरभरा पिकाच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी वर्तवली आहे.
आधीच खरिपात अतिवृष्टीचा फटका आधीच खरीप हंगामात अतिवृष्टीचा मोठा फटका शेतकऱ्यांच्या पिकांना बसला होता. शेतकऱ्यांच्या हाती आलेले पीक पावसामुळे वाया गेले होते. यामध्ये सोयाबीन, कापूस या पिकांना मोठा फटका बसला होता. अशातच शेतकऱ्यांच्या आशा या रब्बी हंगामातील पिकांवर होत्या. मात्र, रब्बी हंगामातील पिकांनाही बदलत्या वातावरणाचा मोठा फटका बसत असल्याचे दिसत आहे.
पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड काही दिवसांपासून ढगाळ वातावरण व वातावरणात सतत होणाऱ्या बदलामुळे हरभऱ्याची वाढ फार कमी आहे. ढगाळ वातावरणामुळे हरभरा पिकावर अळ्यांचा प्रादुर्भाव दिसत आहे. शेतकरी पीक वाचवण्याकरिता वाटेल ते प्रयत्न करत आहेत. परंतु निसर्ग त्यांच्या हाताला यश मिळू देणार की नाही हा प्रश्नच आहे. कारण यावर्षी हरभऱ्याचा उतारा चांगला लागेल हे पिकाकडे बघून वाटत नाही. - गोपाल राऊत, शेतकरी, वनोजा.
शेतकऱ्यांना पिकाबाबत मार्गदर्शन करणे सुरू यावर्षी तालुक्यात १३ हजार ४०० हेक्टरवर हरभरा, तर ३७५० हेक्टरवर गव्हाची पेरणी झाली आहे. ढगाळ वातावरणामुळे रब्बी पिकांवर किडीचे प्रमाण तसेच हरभरा पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव वाढू शकतो. यासाठी कृषी विभागाकडून मर रोग व्यवस्थापन तसेच किडींचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. - रवींद्र इंगोले, तालुका कृषी अधिकारी, मंगरुळपीर.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.