आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन तालुक्यात अतिवृष्टी:पुन्हा पावसाचा तडाखा; शेती पाण्यात, घरांची पडझड, एक जण बुडाला

अमरावती13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मागील तीन आठवड्यांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहेत. काही दिवस पावसाने उघाड दिल्यामुळे पिकांची परिस्थिती सुधारत असतानाच पुन्हा तीन दिवसांपासून जिल्ह्यात धो-धो पाऊस सुरू झाला आहे. रविवारी ते सोमवारी या चोविस तासात तर जिल्ह्यात सरासरी ५५ मिमी. पावसाची नोंद झाली आहे. याच चोविस तासात नांदगाव खंडेश्वर, चांदूर रेल्वे आणि धामणगाव रेल्वे तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे.

पावसामुळे धामणगाव रेल्वे तालुक्यात पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले असून नदी, नाल्यांच्या पुरामुळे शेतजमीन खरडून निघाली आहे. अतिवृष्टीमुळे जवळपास २५ गावे प्रभावित झाली असून एक युवक विहिरीत बुडाला.पावसामुळे कपाशी, सोयाबीन, तुर हे पीक पूर्णता जमीनदोस्त झाले आहे. तसेच इतरही पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून या पावसाचा परिणाम उत्पन्नावर देखील होणार आहे. महसूल विभागाच्या माहितीनुसार गेल्या ४८ तासांपासून या भागात निरंतर पाऊस सुरू आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. वर्धा, विदर्भा, खोलाड या नद्या धोक्याच्या इशारा पातळीवरून वाहात आहे. त्यामुळे लोकांमध्ये भीती पसरली असून काही मार्गावरील वाहतूक बंद पडली आहे. १० ते १२ गावांचा संपर्क तुटला आहे. तालुक्यात गुंजी, तरोडा, दीपोरी, वडगाव, रामगाव, जळगाव आर्वी, विरुळ रोंघे, अंजनसिंगी, चिंचोली, झाडा, मंगरूळ, वाठोडा, दाभाड़ा, देवगाव, शेंदुरजना, कामनापूर, वाघोली, ढाकुलगाव, गव्हा, अशोकनगर, हिंगणगाव या परिसरात शेतीमधून पाण्याचे लोट वाहत आहे. मंगरूळ दस्तगीर हद्दीतील मंगरूळ दस्तगीर ते चिंचोली विटाळा-पुलगाव रस्त्यावरील चिंचोली पुलावरून पाणी वाहात असून मंगरूळ दस्तगीर ते अंजनसिंगी-कुऱ्हा रोडवप खोलाड नदीच्या पुलावरूनही पाणी वाहात आहे.

मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे जवळपास २०० घरांची पडझड झाली असून दीपोरी येथील एक घर पूर्णतः उध्वस्त झाले आहे. विरुळ रोंघे येथील ४, जुना धामणगाव येथील ४ व वडगाव येथील एक कुटुंब बेघर झाले आहे. तर ४० हेक्टर आर शेतजमीन खरडून गेल्याचा सकाळपर्यंतचा प्राथमिक अहवाल आहे. दरम्यान शेती नुकसानीची माहिती देण्यासाठी शेतकरी मोठ्या प्रमाणात तहसील कार्यालयात धडकले आहेत. यात गुंजी येथील विनित टाले, राजेंद्र पवार, हिम्मत वंजारी, राजेंद्र निमकर, ज्ञानेश्वर टाले, हेमंत टाले, पंकज टाले, विशाल पवार, तेजस ठाकरे यांचा समावेश आहे.

शेतातील विहिरीत युवक बुडाला : अतिवृष्टीने जनजीवन विस्कळीत झाले असतानाच जुना धामणगाव येथील एक युवक विहिरीत बुडाल्याची दुर्देवी घटना घडली. आदित्य विजय उईके (१८) असे बुडालेल्या युवकाचे नाव असून तो चारा कापायला शेतात गेला होता, अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे. दरम्यान गावातील पवन आहाके (२७) हा युवकसुद्धा चारा कापायला त्याच्यासोबत होता. पवन व आदित्य या दोघांनी चारा कापून झाल्यावर गंधे यांच्या शेतातील विहिरीत अंघोळ करण्याचे ठरवले. दुपारी ३ च्या सुमारास विहिरीला दोर बांधून दोघांनी विहिरीत पोहायला उडी घेतली असता अचानक दोर तुटला व आदित्य विहिरीत बुडाला. त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र तो वर आलाच नाही, अशी माहिती पवन आहाके याने दत्तापुर पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचली असून सदर युवकाचा शोध घेणे सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...