आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:पशुपालकांसाठी आता अहिल्या शेळी योजना

अमरावती2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शासनाकडून पशुसंवर्धनाला चालना देण्यासाठी आणि नागरिकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासन अनेक योजना आणत असते. त्यापैकी एक योजना म्हणजे अहिल्या शेळी योजना होय. ज्यांना स्वतःचा व्यवसाय करायचा आहे आणि शेळीपालन करून शेळी फार्म उघडायचे आहे, त्यांना शासनाकडून अत्यंत कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे. जिल्ह्यातील पशुपालकांसाठी १० ते २५ डिसेंबरपर्यंत अर्ज मागवण्यात येत आहे. या योजनेसाठी जिल्ह्याला २९९.९७ लाख रुपये निधी प्राप्त झाला आहे.

शेळीपालनाचा सर्वाधिक परिणाम ग्रामीण भागात होतो. पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ, राष्ट्रीय पशुधन अभियाना अंतर्गत ग्रामीण परसबाग शेळी विकास योजना अंतर्गत अहिल्या शेळी योजना राबवण्यात येत आहे. शेळीपालन व्यवसायाला चालना देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. बेरोजगार आणि शेळी पालनाची आवड असलेली कोणतीही व्यक्ती या योजने अंतर्गत शेळी फार्म उघडून जास्तीत जास्त पैसे कमावू शकतात. जिल्ह्यात अनेक शेतकरी बांधव असतील ज्यांच्याकडे कोणताही रोजगार नाही म्हणजेच बेरोजगार असतील, ते अहिल्या शेळीपालन योजना २०२२ मध्ये अर्ज करून रोजगार मिळवू शकतात. शासनाने आता ऑनलाइन अर्ज प्रक्रिया अतिशय सोपी केली आहे.

यामध्ये सर्वसाधारण, अनुसूचित जाती, जनजाती क्षेत्र उपयोजना या घटकांचा समावेश आहे. सर्वसाधारणमध्ये ३५० शेळी गट, अनुसूचित जातीसाठी ३५३ शेळी गट, तसेच जनजाती क्षेत्र उपयोजना या घटकाअंतर्गत १५२ शेळी गट असे एकूण ८५५ शेळी गट वाटप करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. यासाठी २९९.९७ लाख रुपये निधी प्राप्त झाला असून याची अंमलबजावणी करण्यात येत आहे. महामंडळाच्या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याचे आवाहन पशुसंवर्धन विभाग उपायुक्त डॉ. संजय कावरे यांनी केले आहे.

पात्र व्यक्तींनी लाभ घ्यावा
राष्ट्रीय पशुधन अभियाना अंतर्गत अहिल्या शेळी योजना राबवण्यात येत आहे. १८ ते ६० वर्षांपर्यंतच्या पात्र व्यक्तींना या योजनेचा लाभ घेता येतो. २५ डिसेंबरपर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे.- डॉ. संजय कावरे, उपायुक्त, पशुसंवर्धन विभाग.

लाभ कोणाला मिळतो?
या योजनेअंतर्गत १८ ते ६० वयोगटातील व्यक्ती, अनुसूचित जाती, जमाती, दारिद्र्यरेषे खालील, अल्पभूधारक (१ ते २ हेक्टरपर्यंत), असे लाभार्थी पात्र आहेत. महामंडळाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करावे, तसेच ‘अहिल्या योजना अॅप’ डाउनलोड करावा.

बातम्या आणखी आहेत...