आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावती:प्रत्येक तालुक्यात दोन आदर्श शाळांचे उद्दिष्ट ठेवा : मुख्य कार्यकारी अधिकारी

अमरावती4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शासनाकडून निवड करण्यात आलेल्या आदर्श शाळांमध्ये मुलभूत पायाभूत सुविधा पुरविण्यात येत आहेत. या शाळांव्यतिरिक्त प्रत्येक तालुक्यात दोन याप्रमाणे जिल्ह्यातील २८ आणखी शाळांची निवड करून पुढील शैक्षणिक सत्रात त्या आदर्श शाळा करण्याचे उद्दिष्ट पूर्ण करावे, असे निर्देश जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांनी मंगळवार, दि.५ एप्रिल रोजी दिले.

प्रशासक पंडा यांच्या अध्यक्षतेत जिल्हा परिषदेच्या कृषी विषय समिती, शिक्षण विषय समिती व पशुसंवर्धन विषय समितीच्या सभा झाल्या. जिल्ह्यातील २८ शाळा आदर्श करण्‍याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. ते गट शिक्षणाधिकारी यांनी पूर्णत्वास न्यावे. सकाळच्या सत्रातील शाळेची वेळ ही सकाळी ७ ते ११.३० विद्यार्थ्यांकरिता आणि व ७ ते १२.३० या वेळेत शिक्षकांनी उपस्थित राहून शालेय कामकाजाचे तासिकांचे योग्य नियोजन करावे. तसेच शैक्षणिक कामे व अध्यापन कार्य नियमितपणे करावेत अशा सूचनाही त्यांनी दिल्या. शालेय पोषण आहार योजनेच्या स्थितीबाबत आढावा घेऊन त्यांनी पुढील शैक्षणिक सत्रासाठी पाककृतीस मंजूरी मिळण्याबाबत आवश्यक सूचना दिल्या.

बियाणे उपलब्धतेबाबत चर्चा
जिल्ह्यात विविध पिकांच्या १ लाख ३० हजार ४६६ क्विंटल बियाण्यांची आवश्यकता आहे. त्यापैकी प्रामुख्याने सोयाबीन बियाण्यांची १ लाख १३ हजार ७५० क्विंटल आवश्यकता आहे. महाबीजकडून ६५ हजार क्विंटल बियाणे पुरवठा करणे शक्य नसून १० ते १२ हजार क्विंटल सोयाबीन बियाणे पुरवठा होईल असे महाबीजचे जिल्हा व्यवस्थापक यांनी सांगितले. जिल्ह्यात शेतकऱ्यांनी २ लाख ८१ हजार ३९९ क्विंटल सोयाबीन बियाणे घरचे राखून ठेवलेले आहे. त्यामुळे सोयाबीन बियाण्याची टंचाई निर्माण होणार नाही असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी सांगितले.

जिल्हयामध्ये सध्या शिल्लक असलेला २१ हजार मे. टन खत साठा तसेच जीएसएफसी या कंपनीकडून या सप्ताहात प्राप्त १ हजार मे. टन खत साठ्याची विक्री करावी. खत उपलब्धता व वापराबाबत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व कृषी विकास अधिकारी यांनी दर आठवड्याला माहिती सादर करावी, असेही निर्देश त्यांनी दिले.

जनजागृती करण्याचे निर्देश
खरीप हंगाम २०२२ साठी रासायनिक खताचे १ लाख १४ हजार ९४० मे. टन आवंटन मंजूर आहे. मागील वर्षी ९६ हजार मे. टन खताची विक्री झालेली होती. मंजूर आवंटन पुरेसे आहे. परंतु डीएपी या रासायनिक खताचा पुरवठा यावर्षी आवंटनाप्रमाणे होणार नाही. त्यामुळे एसएसपी, युरिया व संयुक्त खते वापरण्यासाठी जनजागृती करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

कृषी समिती स्थापनेला वेग द्या
जिल्ह्यात १०० टक्के गावांमध्ये एका आठवड्यात ग्राम कृषी विकास समिती स्थापन होतील. याबाबत दक्षता घेण्याचे निर्देश पंचायत समितीच्या कृषी अधिकाऱ्यांना देण्यात आले. पशुधन विकास अधिकाऱ्यांनी कामकाजाचा अहवाल सादर करावा अशी सूचना त्यांनी केली. तसेच नया अकोला पशूधन पर्यवेक्षक या रिक्त पदाबाबत व पंचायत समितीमधील आरएसपी यांना पदस्थापना देण्याबाबत चर्चा करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...