आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकीकडे ओबीसी आरक्षणासाठी प्रयत्न:दुसरीकडे मागासप्रवर्गाचा उमेदवारच न मिळाल्याने आखतवाड्याचे सरपंच राहणार रिक्त

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

ओबीसींना आरक्षण मिळावे, यासाठी काही राजकीय पक्ष व संघटना एकीकडे रान उठवत असतानाच ओबीसीचा (नागरिकांचा मागासप्रवर्ग) एकही व्यक्ती नसल्यामुळे तिवसा तालुक्यातील आखतवाड्याचे सरपंचपद व एक सदस्यपद रिक्त राहिले आहे.

राज्य निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या कार्यक्रमानुसार जिल्ह्याच्या अमरावती (रोहणखेडा), चांदूररेल्वे (चांदूरवाडी) व धारणी (हरिसाल) तालुक्यातील प्रत्येकी एका ग्रामपंचायतसह तिवसा तालुक्यातील घोटा, कव्हाडगव्हाण, उभरखेड व आखतवाडा या चार ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक आगामी 18 सप्टेंबर रोजी होत आहे.

सरपंचपद थेट जनतेतून निवडायचे असल्याने या निवडणुकीला प्रचंड महत्व प्राप्त झाले आहे. हरिसाल ही 11 सदस्यीय ग्रामपंचायत असून इतर सर्व ग्रामपंचायती ह्या प्रत्येकी सात सदस्यीय आहेत. या सर्व ग्रामपंचायतींसाठी उमेदवारी दाखल करण्याचा आज (ता. 1 सप्टेंबर) हा शेवटचा दिवस होता. परंतु आखतवाड्याचे सरपंचपद आणि याच ग्रामपंचायतीमधील एका सदस्यपदासाठी एकही अर्ज प्राप्त झाला नाही. ही दोन्ही पदे नामाप्र संवर्गाच्या महिलांसाठी राखीव आहेत.

जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्या कार्यालयाने पुरविलेल्या माहितीनुसार आखतवाड्यासारखीच स्थिती आणखी कोणत्याही ग्रामपंचायतीची नाही. याऊलट इतर ग्रामपंचायतींमधील काही जागा अविरोध विजयी झाल्या आहेत. या सर्व जागांचा खुलासा माघारीच्या शेवटच्या दिवशी होईल. दरम्यान सातही ग्रामपंचायतींच्या ५३ सदस्यपदांसाठी 121 तर आखतवाडा वगळता उर्वरित 6 सरपंचांसाठी 33 अर्ज प्राप्त झाले आहेत. यापैकी किती जण माघार घेतात, हे लवकरच स्पष्ट होणार आहे.

यापूर्वीही सभापती पद होते रिक्त

विशिष्ट संवर्गाचा उमेदवार न मिळाल्यामुळे यापूर्वी नांदगाव खंडेश्वर पंचायत समितीचे सभापतिपद रिक्त राहीले होते. दरम्यान दोनदा हीच प्रक्रिया राबविल्यानंतरही चे पद न भरल्या गेल्यामुळे जिल्हा प्रशासनाने निवडणूक आयोगाकडून मार्गदर्शन मागविले होते. त्यानंतर ते पद दुसऱ्या संवर्गात विलीन करून नव्याने निवडणूक घ्यावी लागली होती. तसेच काहीसे यावेळीही करावे लागेल' असे दिसून येते.

बातम्या आणखी आहेत...