आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावेळीच दखल न घेतल्यास प्रसंगी मृत्यूच्या खाईत लोटणाऱ्या ‘मंकी पॉक्स’ या आजाराच्या नाकाबंदीसाठी आरोग्य प्रशासनाने अलर्ट जारी केला असून, सर्वत्र खबरदारी घेण्याचे निर्देश दिले आहेत. जिल्ह्यातील तीन उपजिल्हा रुग्णालयांसह सर्व चौदाही तालुक्याचे आरोग्य अधिकारी (टीएओ) आणि ५९ प्राथमिक आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधीक्षक यांना मार्गदर्शक तत्वे पुरवली. ‘मंकी पॉक्स’च्या उगमापासून ते उपाय योजनांपर्यंतच्या तपशीलाचा या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये समावेश आहे.
केरळमध्ये पहिला रुग्ण आढळल्यानंतर दोन दिवसांपूर्वी राज्यात पालघर येथे मंकी पॉक्सचा एक संशयित रुग्ण दिसून आला. या पार्श्वभूमीवर अलर्ट घोषित केला असून, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सहसचिवांनी संहिता आखून दिली आहे. त्या संहितेनुसार जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले यांनी सोमवारी जिल्ह्यातील सर्व ५९ पीएचसी व १४ टीएओंशी पत्रव्यवहार केला. त्यामुळे जिल्हाभरातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालये व इतर संलग्न यंत्रणा अॅक्शन मोडवर आल्या. सदर आजाराची लक्षणे व उपाय योजनांबाबत त्यांनी जनजागरण सुरू केले आहे
मंकी पॉक्सचा एक रुग्णदेखील साथरोग उद्रेक ठरू शकतो. त्यामुळे सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांनी खबरदारी घ्यावी. प्रत्येक रुग्णालयातील त्वचा व गुप्तरोग विभाग तसेच मेडिसिन आणि बालरोग विभागातील सर्वेक्षणावर भर द्यावा. गोवर, रुबेला सर्वेक्षण करणारी पथके आणि राष्ट्रीय एडस् नियंत्रण कार्यक्रमातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची त्यासाठी मदत घ्यावी. एड्सची जोखीम घेऊन जगणाऱ्या नागरिकांबाबत केल्या जाणाऱ्या नियमित सर्वेक्षणातूनही काही माहिती मिळण्याची शक्यता असल्याने तेथील यंत्रणेलाही दक्ष करावे, असे डीएचओंचे आदेश आहेत.
दरम्यान जि.प. सीईओ अविश्यांत पंडा यांनी सोमवारी सकाळी आरोग्य यंत्रणेची बैठक घेतली. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले, एडीएचओ डॉ. रेवती साबळे, लसीकरण अधिकारी डॉ. विनोद करंजेकर, साथ रोग अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. दूषित पाण्यामुळे अलीकडेच मेळघाटात कॉलराची साथ पसरली होती. त्यात चार जणांचा जीवही गेला. या पार्श्वभूमीवर मेळघाटकडे विशेष लक्ष ठेवा, असे या बैठकीत सांगण्यात आले. दरम्यान संशयित रुग्ण आढळून आल्यास त्या रुग्णाचे विलगीकरण करावे. सदर आजाराचा संसर्ग झपाट्याने बळावत असल्याने रुग्णाशी पीपीई किट घालूनच औषधोपचार व इतर व्यवहार करावा, अशी उपाययोजनाही या बैठकीत सांगण्यात आली.
आजार कसा वाढतो
ताप, लसिका ग्रंथींना सूज, डोकेदुखी, अंगदुखी, थंडी वाजणे, घाम येणे, घसा खवखवणे आणि खोकला ही या आजाराची प्रारंभिक लक्षणे आहेत. त्यामुळे वेळीच खबरदारी न घेतल्यास त्वचेवर रॅश उमटणे, हात, पाय, पोट, पाठीवर फोड येणे असा हा आजार वाढत जातो. कुपोषण, कृमी प्रादुर्भाव आणि प्रतिकार शक्ती कमी असलेल्यांमध्ये तो गंभीर स्वरूप धारण करू शकतो.
कसा होतो मंकी पॉक्स?
मंकी पॉक्स हा आजार ऑर्थोपॉक्स व्हायरस या डीएनए प्रकारच्या विषाणुमुळे होते. काही प्रकारच्या खारी आणि उंदरांमध्ये हा विषाणू आढळतो. हे प्राणी या विषाणूचा नैसर्गिक स्रोत आहेत. अंगावर रॅश उठण्यापूर्वी १ ते २ दिवसांपासून ते त्वचेवरील फोडांच्या खपल्या पडेपर्यंत किंवा ते पूर्णपणे मावळेपर्यंत बाधित रुग्ण इतर रुग्णांसाठी संसर्गजन्य ठरत असतो.
जिल्हाभर दक्षतेचा इशारा
केंद्र शासनाच्या निर्देशानुसार साेमवारी जिल्ह्यातील ५९ पीएचसी व १४ टीएओंशी पत्रव्यवहार केला. शासनाची संहिताही मेलद्वारे त्यांना पाठवली. विदर्भ किंवा अमरावती जिल्ह्यात सध्या कोठेही अशी स्थिती नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये. परंतु लक्षणे दिसल्यास त्वरित आरोग्य यंत्रणेशी संपर्क करून डॉक्टरांना सहकार्य करावे.- डॉ. दिलीप रणमले, जिल्हा आरोग्य अधिकारी, अमरावती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.