आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहानूर धरणाचे चारही दरवाजे उघडले:नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

अमरावती23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहानूर धरणातील जलाशयाच्या पातळीत वाढ झाली असून आज, सोमवार, 12 सप्टेंबर रोजी धरणाचे चारही दरवाजे पाच ते दहा सेंटीमीटरने उघडण्यात आले आहे. दरम्यान या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

शहानूर धरणाजवळील गिरगोटी पर्जन्यमान केंद्रात 60 मिलीमीटर तर शहानूर धरण क्षेत्रात ७२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून शहानूर धरणातील जलाशयाची पातळी वाढली आहे. शहानूर धरणाची जलाशय पातळी 448.98 मीटर असून पूर्ण साठा 46.35 द.ल.घ.मी. आहे. सध्या या धरणाचा साठा 96.86 टक्के झाला असून त्यामुळे शहानूर धरणाचे दोन द्वार 5 सेंटीमीटरने तर उर्वरित दोन द्वार 10 सेंटीमीटरने उघडण्यात आले आहेत. धरणाचे पाणी नदीत सोडल्यामुळे शहानूर नदीला पूर येण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

पावसामुळे शहानूर धरण पूर्ण भरले असल्याने नागरिकांनीसुद्धा समाधान व्यक्त केले आहे. अंजनगाव सुर्जी, दर्यापूर या दोन शहरासह एकूण जवळपास ग्रामीण भागातील तीनशे गावातील जनतेची शहानूर धरणातून तहान भागविल्या जाते. तर कालव्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आवश्यक वेळी पिकांना पाणीसुद्धा दिल्या जाते. शहानुर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस सुरू असून शहानुर प्रकल्पात पाणी वाढ होणार असल्याचे शहानुर लघु मध्यम प्रकल्पाचे सहायक अभियंता सुमित हिरेकर यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले.

सततच्या पावसामुळे ओढवली ही वेळ

अंजनगाव सुर्जी तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून संततधार पाऊस सुरु आहे. पावसामुळे नदी-नाले तुडूंब भरुन वाहात असून सामान्य नागरिक व शेतकऱ्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. दरम्यान सततच्या पावसाला नागरिक कंटाळले असून गरज नसताना आता पाऊस येतो कशाला, असा प्रश्न विचारित आहेत.

बातम्या आणखी आहेत...