आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हुश्श!..अमरावतीचे चारही सॅम्पल स्वाइन फ्ल्यू निगेटिव्ह:एनआयव्हीने तपासणी करून पाठवलेले आणखी 5 सॅम्पल; अहवालाची प्रतीक्षा

अमरावती3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मागील काही दिवसांपासून शहरात स्वाईन फ्लू सदृश्य आजाराची लक्षणे काही रुग्णांमध्ये आढळली होती. त्यामुळे संशयित रुग्णांची तपासणी करण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला. दरम्यान सहा दिवसांपूर्वी एनआयव्ही पुणे यांच्याकडे तपासणीसाठी पाठवलेले चार सॅम्पल निगेटिव्ह असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे, मात्र अजूनही पाच सॅम्पलचे अहवाल येणे बाकी आहे.

वीस दिवसांपूर्वी शहरात एका 45 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला होता. त्याचा मृत्यू स्वाइन फ्लूने झाल्याचे समोर आल्यामुळे चांगलीच खळबळ उडाली होती. त्यानंतर 12 ऑगस्ट रोजी येथील सुपर स्पेशालिटी रुग्णालयात आणखी एका संशयित रुग्णाचा मृत्यू झाला. त्यामुळेच त्या मृत रुग्णासह अन्य तीन असे एकूण चार सॅम्पल आरोग्य विभागाने विद्यापीठ कोविड-19 प्रयोगशाळेच्या माध्यमातून तपासणीसाठी पुणे येथील एनआयव्हीकडे पाठवले होते.

दरम्यान सहा दिवसानंतर या चार सॅम्पलचे अहवाल विद्यापीठ प्रयोगशाळेला प्राप्त झाले आहे, हे चारही सॅम्पल निगेटिव्ह असल्याचे समोर आले आहे. हे चार सॅम्पल निगेटिव आले असले तरीही नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे, असे तज्ञांनी सांगितले.

विद्यापीठातील कोविड - 19 विषाणू तपासणी प्रयोग शाळेतच स्वाईन फ्लू चाचणी करण्याचे निर्देश आरोग्य संचालकांनी चार दिवसांपूर्वीच दिले आहे. त्यामुळे लवकरच याच प्रयोग शाळेत स्वाईन फ्लूची चाचणी होणार आहे. चाचणी करण्यासाठी आवश्यक असलेल्या मशीनसुद्धा पूर्वीच उपलब्ध आहे मात्र या चाचणीला आवश्यक असलेल्या इन्फ्लुईनांझा आरटिपीसीआर किट मात्र अजूनही विद्यापीठ प्रयोगशाळेला प्राप्त झालेल्या नाहीत. त्या किट तत्काळ प्राप्त झाल्या तर अमरावती विद्यापीठातच तातडीने स्वाइन फ्लूची चाचणी केली जाईल. त्यामुळे अमरावतीवरून स्वाइन फ्लूची नमुने पुणे किंवा नागपूर येथे तपासणीसाठी पाठवण्याची गरज उरणार नाही.

पर्यायाने डॉक्टरांना संशयित रुग्णाचा स्वाइन फ्लू चाचणी अहवाल 24 तासात मिळणार आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभागाने तातडीने या प्रयोगशाळेला किट उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावे, अशी चर्चा सुद्धा सध्या सुरू आहे.

पाच सॅम्पलच्या अहवालाची प्रतीक्षा

सहा दिवसांपूर्वी पाठवलेले चार स्वाईन फ्लू संशयित सॅम्पल प्राप्त झाले असून ते निगेटिव्ह आहे. अन्य पाच सॅम्पल अहवाल येणे अद्याप बाकी आहे. - प्रा. डॉ. प्रशांत ठाकरे, नोडल अधिकारी, विद्यापीठ प्रयोगशाळा, अमरावती.

बातम्या आणखी आहेत...