आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Amravati
  • All Religion Equality In Amravati | During The Funeral Procession Of A Muslim Woman | Devotees Stopped Playing Musical Instruments | Ganeshotsav

अमरावतीत सर्वधर्म समभाव:मुस्लीम महिलेच्या अंत्ययात्रेप्रसंगी विसर्जन मिरवणुकीत भाविकांनी वाद्य बंद ठेवत दिला रस्ता

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मुस्लीम बहुल वस्ती असलेल्या अचलपूर शहरातील झेंडा चौक नेहमीच जातीय तेढीच्या घटनांचा साक्षीदार बनला आहे. या चौकात होणाऱ्या विवादांची नोंद पोलिस दप्तरी संवेदनशील असली, तरी गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीदरम्यान मुस्लीम महिलेची अंत्ययात्रा जात असताना गणेश भक्तांनी आपले वाद्य, ढोल-ताशे बंद ठेवत या अंत्ययात्रेसाठी दिलेला रस्ता या झेंडा चौकाची नवीन ओळख ठरला आहे.

अचलपूर शहरात गेल्या अनेक वर्षांपासून हिंदू-मुस्लीम कुटुंबिय एकत्रित राहून प्रत्येकाच्या सणवारात सहभागी होतात. मात्र काही विघ्न संतोषी लोकांमुळे हे शहर नेहमी संवेदनशील करण्याचा प्रयत्न झाला असला, तरी मात्र गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सामाजिक सौहदार्याच्या एक नवा पायंडा पाळत पुनश्च जातीयवादी कुनितीला थारा न देत एकतेची मिसाल कायम केली.

बियाबानी निवासी शेख यांचे अंत्यसंस्कार

अचलपूर शहरात गणपती विसर्जनाची मिरवणूक सुरू असताना विविध सार्वजनिक गणेश मंडळांचे सदस्य गणपती बाप्पाला निरोप देताना भक्तीभावात तल्लीन होते. मिरवणुकीदरम्यान बिलनपुरा, अचलपूर येथील झेंडा चौक हा नेहमीच गर्दीचा भाग असतो. त्याच दरम्यान अचलपूर शहरातील बियाबानी निवासी शेख रफिक किराणा यांच्या परिवारातील एका महिलेचे निधन झाल्याने त्यांची अंतिम यात्रा या झेंडा चौकातून जात असताना सर्व गणेशोत्सव मंडळाने आपले ढोल-ताशे, पारंपारिक वाद्य व लेझीम बंद ठेवली.

सर्वधर्म समभावाचा विचार

या अंतीम यात्रेत 300 ते 400 मुस्लिम नागरिक सहभागी झाले होते. खिडकीगेटपर्यंत ही अंत्ययात्रा गेल्यानंतर गणपती विसर्जनाची मिरवणूक पुन्हा प्रारंभ झाली. अचलपूर शहर संवेदनशील नव्हे, तर सर्वधर्म समभावाचा विचार देणारे शहर असल्याचा संदेश या मिरवणुकीच्या माध्यमातून दोन्ही समाजबांधवांनी दिला. यावेळी अचलपूरचे ठाणेदार माधव गरुड, शांतता समिती सदस्य, हेल्पलाईन सदस्य, गणपती मंडळ सदस्य व विविध सामाजिक कार्यकर्त्यांचा सहभाग महत्त्वपूर्ण ठरला.

एकतेचा संदेश प्रेरणादायी

माधव गरुड म्हमाले, अचलपूर शहरातील गणेश मंडळांच्या भक्तांनी मुस्लीम महिलेच्या अंत्ययात्रेदरम्यान मिरवणुकीतून रस्ता मोकळा करून देत दिलेला संदेश निश्चितच प्रशंसनीय असून इतरांसाठी प्रेरणादायी आहे. हा हिंदू-मुस्लीम समाजाने एकत्रित येत सौहदार्याचा संदेश दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...