आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागौण खनिज प्रकरणांमध्ये गंभीर स्वरुपाच्या अनियमितता आणि विनापरवानगी कर्तव्यावर गैरहजर राहण्यासोबतच वर्तणुकीबाबच्या तक्रारी असल्यामुळे धामणगाव रेल्वेचे तहसीलदार प्रदीप शेलार यांना निलंबीत करण्यात आले आहे. त्यांच्या अशा वागण्याबाबत स्थानिक आमदार प्रताप अडसड यांनीही तक्रार नोंदविली होती.
शेलार यांच्या निलंबनाचे आदेश शासनाचे अवर सचिव संजीव राणे यांच्या स्वाक्षरीने बजावण्यात आले आहे. विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे यांच्यामार्फत ते आज, शेलार यांच्यापर्यंत पोहोचविण्यात आले. निलंबन पत्रातील तपशिलानुसार शेलार हे वरिष्ठांचे आदेश पाळत नव्हते. त्यांच्या वर्तणुकीबाबत खुद्द जिल्हाधिकारी यांनी तक्रार नोंदवून त्यांच्या निलंबनाची शिफारस केली होती. पुढे ही शिफारस विभागीय आयुक्तांमार्फत शासनाकडे पाठविण्यात आली आणि शासनाने त्या अनुषंगाने प्राधिकृत प्राधिकारिणीकडे हे प्रकरण पाठविले. दरम्यान त्या सक्षम प्राधिकारिणीने सदर निलंबनावर शिक्कामोर्तब केले असून राज्यपालांच्या परवानगीने शासनाचे अवर सचिव संजीव राणे यांनी तसे आदेश जारी केले आहे.
तुम्ही माझ्याशी जुळवून न घेतल्यास मी आपले राजकीय वर्चस्व धोक्यात आणू शकतो. माझे मंत्रालयापर्यंत मोठे संबंध आहे. त्यामुळे गाठ माझ्यासोबत आहे, असा धमकी-वजा-इशारा शेलार याने आमदार प्रताप अडसड यांना दिला होता.
तहसील कार्यालयात असताना प्रदीप शेलार हे शेतकरी हिताची कामे बाजूला सारून नेहमी गौण खनिजाचा अवैधपणे उपसा करणाऱ्यांची पाठराखण करतात, असेही अडसड यांच्या तक्रारीत म्हटले होते. दरम्यान वर्धा नदीच्या रेती घाटातून दिवसा उत्खनन व वाहतुकीला परवाना नसताना रात्रीला बोटींद्वारे रेतीचे उत्खनन सुरू होते, असे आमदारांचे निरीक्षण आहे.
दरम्यान आमदार प्रताप अडसड यांनी पोलिसांच्या सहकार्याने धाड टाकून चार बोटी तसेच अनेक ट्रक जप्त केले होते. तहसीलदार प्रदीप शेलार यांनी घटनास्थळी न पोहचता उलट दुसऱ्या दिवशी आमदार प्रताप अडसड यांचे राजकीय वर्चस्व संपवून टाकण्याच्या धमक्या शेलार यांनी दिल्या होत्या त्यावेळी आ. अडसड यांनी तहसीलदार शेलार यांच्याविरुद्ध पुरावे सादर केले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.