आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेमडेसिवीरचा काळाबाजार:तिवसा ग्रामीण रुग्णालयात उचलपेक्षा 50 रेमडेसिवीरचा वापर कमी; जिल्हाधिकारी नियुक्त चौकशी समितीचे शिक्कामोर्तब

अमरावती2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • एफडीए’च्या तपासात घोळ समोर डॉ. पवन मालुसरेच्या खासगी कोविड रुग्णालयात 40 इंजेक्शनचा वापर जास्त

तिवसा ग्रामीण रुग्णालयात २७ फेब्रुवारीपासून कोविड रुग्णालय सुरू झाले. त्यामुळे २७ फेब्रुवारी ते १२ मे या ७५ दिवसांत तिवसा ग्रामीण रुग्णालयाच्या नावाने शासकीय कोट्यातील सुमारे ७०० रेमडेसिविरची उचल झाली असून, प्रत्यक्षात मात्र, ६४८ व्हायलचाच वापर झाल्याच्या नोंदी आहे, त्यामुळे उर्वरित ५० ‘रेमडेसिविर’ गेले कुठे हा प्रश्न उपस्थित होत असतानाच डॉ. पवन मालुसरे यांच्या शहरातील खासगी कोविड रुग्णालयासाठी आठ दिवसांत २९ रेमडेसिविरची उचल झाल्याची नोंद आहे. मात्र, प्रत्यक्षात त्या रुग्णालयात ६९ रेमडेसिविरचा वापर झालेला आहे. त्यामुळे या रुग्णालयात उचलपेक्षा ४० जास्त ‘रेमडेसिविर’ वापरण्यात आले. या दोन्ही रुग्णालयात रेमडेसिविरचा मोठा ‘घोळ’ झाल्याचे तपासात समोर आल्याचे ‘एफडीए’च्या विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

शहर गुन्हे शाखेच्या पथकाने दहा दिवसांपूर्वी रेमडेसिविरचा काळाबाजार करणारी सात जणांची टोळी पकडली होती. यामध्ये तिवसा ग्रामीण रुग्णालयाचा वैद्यकीय अधीक्षक डॉ. पवन मालुसरे याचाही समावेश होता. या प्रकरणात अटक केलेल्या सात संशयित आरोपीची गुन्हे शाखेने पोलिस कोठडी न्यायालयात न मागितल्यामुळे गुन्हे शाखेच्या तपासावर अनेकांनी प्रश्नचिन्ह उभे केले होते. दरम्यान, पोलिस आयुक्तांनी चार दिवसांपुर्वी हा तपास आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शिवाजी बचाटे यांच्याकडे दिला. त्यानंतर पीआय बचाटे यांनी सखोल तपासाला सुरूवात केली आणि त्यामधून अनेक धक्कादायक खुलासे पुढे येणार आहेत.

याच दरम्यान ‘एफडीए’कडूनही सुक्ष्म चौकशी सुरू झाली आहे. याच चौकशीदरम्यान असे पुढे आले की, तिवसा तालुक्यातील रुग्णांसाठी तिवसा ग्रामीण रुग्णालयात कोविड रुग्णालय २७ फेब्रुवारीपासून कार्यान्वित करण्यात आले. त्यामुळे २७ फेब्रुवारी ते १२ मे या ७५ दिवसांच्या कालावधीत शासनाकडून जिल्ह्यासाठी विनामूल्य प्राप्त झालेल्या एकूण रेमडेसिविरपैकी सुमारे ७०० व्हायलची उचल तिवसा ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांसाठी झाली आहे. तपासादरम्यान रुग्णालयातील नोंदी पाहिल्यावर असे लक्षात आले की, यापैकी ६४८ व्हायलचा वापर झाला आहे. मात्र, उरलेले ५० ते ५२ रेमडेसिविर गेले कुठे?, पोलिसांनी तर कारवाई करताना पाचच जप्त केले आहे. त्यामुळे उर्वरित ४५ रेमडेसिविर कुठे आहेत. यासोबतच डाॅ. पवन मालुसुरे याने अमरावतीत संजीवनी, मन मुकूंद नावाने खासगी कोविड रुग्णालय ४ मे पासून रुग्णांच्या ‘सेवेत’ आणले आहेत.

गुन्हे शाखेने १२ मे रोजी हे रॅकेट पकडले. ९ दिवसांत संजीवनी - मन मुकुंद रुग्णालयात एकूण ६९ रेमडेसिविरचा वापर रुग्णांसाठी केल्याच्या नोंदी ‘एफडीए’च्या चौकशीत पुढे आले आहे. याचवेळी प्रत्यक्षात मात्र या रुग्णालयासाठी केवळ २९ रेमडेसिविरच अधिकृतरित्या उचलण्यात आले आहे. अशी महत्वपूर्ण माहिती चौकशीतून पुढे आल्याचे ‘एफडीए’चे अधिकारी मनीष गोतमारे यांनी ‘दिव्य मराठी’ला दिली. या तपासा वरुन संजीवनी- मनमुकुंदमध्ये अतिरिक्त ४० रेमडेसिविर आले कुठून आणि तिवसा रुग्णालयातून ५० रेमडिसिविर गेले कुठे, याचा हिशोब मात्र अजून समोर आला नाही.

आज किंवा उद्या बजावणार नोटीस
मी नेमलेल्या पाच सदस्यीय चौकशी समितीने अहवाल सादर केला आहे. या अहवालानुसार या आरोपींचे निलंबन व त्यात अंतर्भूत खासगी रुग्णालयाची मान्यता रद्द करण्याची शिफारस करण्यात आली आहे. त्यानुसार एका हॉस्पिटलची मान्यता रद्द करुन ते बंद करण्यात आले आहे. निलंबनाबाबत संबंधितांना आज-उद्या नोटीस बजावून सदर अहवाल शासनाकडे पाठविला जाणार आहे. शैलेश नवाल, जिल्हाधिकारी.

पोलिसांनी जप्त केली महत्वाची कागदपत्रे
या प्रकरणात पीआय बचाटे यांनी तपास सुरू केल्यानंतर तिवसा ग्रामीण रुग्णालय, शासकीय व खासगी रेमडेसिविरचे ज्या ठिकाणांवरून वितरण केले जाते, त्या ठिकाणाहून कागदपत्र ताब्यात घेतली तसेच तिवसा ग्रामीण रुग्णालयातून ही व अन्य ठिकाणाहून तपासासाठी महत्वाचे कागदपत्र जप्त केले आहेत.

सोमवारी सुनावणी शक्य
रुग्णांच्या नातेवाइकाकडून रक्कम उकळणाऱ्या या संशयित आरोपींवर गुन्हे शाखेने ‘मेहरबानी’ करुन त्यांची पोलिस कोठडी मागितली नव्हती. त्यानंतर डॉ. मालुसरेसह तिघांना अंतरिम अटकपूर्व जामीन मिळाला आणि ते बाहेर आले आहेत. दरम्यान, या प्रकरणात त्या तिघांसह कारागृहात असलेल्या तिघांचा जामीन रद्द झाला आहे. आता बाहेर असलेल्या तिघांना पुन्हा पोलिस कोठडीत देण्याची मागणी नवे तपास अधिकारी बचाटे यांनी न्यायालयाकडे केली आहे. या मागणीवर सोमवारी न्यायालयात सुनावणी होण्याची शक्यता आहे.

बातम्या आणखी आहेत...