आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिलासा:जिल्ह्यात उद्यापासून क्रीडांगणे, मंगल कार्यालये, कार्यक्रमांना राहणार मुभा; जिल्हा प्रशासनाचा आदेश जारी

अमरावती14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जिल्ह्यातील निर्बंध आणखी शिथिल, काही अटींच्या अधीन राहून दिली परवानगी

अमरावती

कोरोनाबाधीतांचे आकडे आणि ऑक्सीजनयुक्त खाटांची संख्या या निकषावर अमरावती जिल्ह्यातील निर्बंध आणखी शिथिल करण्यात आले आहेत. त्यामुळे सोमवार, ७ जूनपासून क्रीडांगणे, मंगल कार्यालये, सभा-संमेलन आणि सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांनाही काही अटींच्या अधीन राहून परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान काेराेनाचा संसर्ग राेखण्यासाठी लावण्यात आलेल्या लाॅकडाऊनमुळे शहरातील क्रीडांगणे आणि मंगल कार्यालये गेल्या सहा महिन्यांपेक्षा अधिक काळापासून बंद हाेती.

नव्या नियमानुसार बाजारपेठेची वेळेही दोन तासांनी वाढवून देण्यात आली आहे. त्यामुळे आता सर्व प्रकारची दुकाने सकाळी ७ ते दुपारी ४ या वेळेत सुरु राहू शकतील. परंतु शनिवार-रविवार या विकेंडच्या दोन दिवशी केवळ धान्य, किराणा, भाजीपाला, दुध-दही, बेकरी पदार्थ अशी जीवनावश्यक वस्तूंचीच दुकाने उघडी ठेवली जाणार असून, इतर दुकानांवरील सध्याचे निर्बंध कायम ठेवण्यात आले आहे. मंगल कार्यालये आणि क्रीडांगणांना मुभा दिल्यामुळे अडकलेले लग्न विधी आणि आऊटडोअर खेळ स्पर्धांचा मार्ग मोकळा झाला आहे. खुल्या क्रीडांगणातील खेळ सकाळी ५ ते दुपारी १ या वेळात खेळण्यास परवानगी देण्यात आली आहे. तर लग्न विधीसाठी केवळ ५० जणांना परवानगी देण्यात आली आहे.

मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातील (२२ ते २९ तारखेदरम्यान) पॉझीटिव्हिटी दहा टक्क्यांच्या आत आणि ऑक्सीजनयुक्त खाटांचा वापर वीस टक्क्यांहून अधिक नसल्यामुळे अमरावती जिल्ह्याला आधीच शिथिलता मिळाली होती. १ जूनपासूनच्या त्या शिथिलतेमुळे सर्व प्रकारची दुकाने सकाळी ७ ते दुपारी २ पर्यंत उघडी ठेवली जात आहेत.

हॉटेलमध्ये जेवायला जा, पण जरा जपूनच
नव्या आदेशानुसार हॉटेल्स, खानावळी, शिवभोजन थाळी सकाळी ७ ते दुपारी ४ पर्यंत सुरु ठेवता येणार आहेत. परंतु आसन क्षमतेच्या ५० टक्के ग्राहकांनाच प्रवेश दिला जावा, अशी अट आहे. तर दुपारी ४ नंतर रात्री ८ पर्यंत पार्सल सेवा द्यावी, असे निर्देश आहेत.

सभा, बैठकांना ५० टक्क्यांची अट
निर्बंध शिथिल झाल्यामुळे राजकीय व सामाजिक संस्था, संघटनांना बैठका घेता येतील. परंतु सभा-बैठकीचे जे स्थळ निवडण्यात आले आहे, त्या स्थळाच्या एकूण क्षमतेच्या केवळ ५० टक्के उपस्थितीतच असे कार्यक्रम घ्यावे, असे आदेशात म्हटले आहे. हीच अट मनोरंजनाच्या श्रेणीतील नृत्य-नाट्यालाही लागू असेल. परंतु हे सर्व कार्यक्रम संबंधित अधिकाऱ्यांच्या पूर्वपरवानगीनेच घेता येणार आहे.

‘त्या’ निवडणुकांनाही मुभा
कोरोनामुळ अनेक दिवसांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांमधील काही प्राधिकारिणींच्या निवडणुकाही थांबल्या. नव्या आदेशानुसार त्याही घेता येतील. कोरोनाचे नियम पाळून अशा निवडणुका घेण्यास प्रशासनाची हरकत नाही, असे आदेशात नमूद आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सेवा सहकारी सोसायटी, नोकरदार वर्गाच्या काही पतसंस्था, इतर सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा मार्गही मोकळा झाला. त्यास ५० टक्के आसनक्षमतेची अट आहे.

तर पुन्हा निर्बंध लावणार
कोरोनाबाधीतांची संख्या अर्थात पॉझीटिव्हिटी, ऑक्सीजन युक्त खाटांची संख्या यावर शासनाने निर्बंध शिथिल केले . यातील आढावा शुक्रवारी घेतला जाईल. दरम्यान जर संख्या पुन्हा वाढली तर जुनेच निर्बंध कायम केले जाणार आहेत. शैलेश नवाल, जिल्हाधिकारी.

‘त्या’ गेम्सला मुभा नाही
शिथिल निर्बंधानुसार मैदानातील खेळ व कसरती करता येतील. परंतु बॅडमिंटन, टेबल टेनीस, तलवारबाजी, कुस्ती अशा इनडाेअर गेम्सला मात्र मुभा दिली नाही. क्रीडांगणातील, मोकळ्या जागेतील खेळांनाच परवानगी देण्यात आल्याचे जिल्हाधिकारी यांच्या आदेशात म्हटले आहे.
क्रीडांगणांवरील अशा कसरती आता सोमवारपासून पुन्हा दिसून येतील.

बातम्या आणखी आहेत...