आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोग्य विभाग दक्ष:यावर्षी पहिल्यांदाच विसर्जनस्थळी रुग्णवाहिका सेवा

अमरावती24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गणेश विसर्जन निमित्ताने शहर व जिल्ह्याचा आरोग्य विभाग दक्ष झाला असून यावर्षी पहिल्यांदाच विसर्जनस्थळी डॉक्टरसह रुग्णवाहिका उपलब्ध करुन दिली जाणार आहे. त्याचवेळी गणेशभक्तांना त्वरेने उपचार मिळावा म्हणून प्रत्येक सरकारी-निमसरकारी रुग्णालयात दहा खाटांचा एक कक्ष राखीव ठेवण्यात आला आहे. अमरावती जिल्ह्यात उद्या, शुक्रवारपासून सलग चार दिवस गणेश बाप्पांना निरोप दिला जाणार आहे. ग्रामीण भागातील काही गावांत गुरुवारीही गणेश विसर्जन करण्यात आले.जिल्हा परिषदेचे सीइओ अविश्यांत पंडा यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाने यावर्षी परिपूर्ण नियोजन केले असून जिल्ह्यातील मुख्य विसर्जनस्थळी प्रथमोपचाराची कीट उपलब्ध करुन दिली आहे.

त्याचवेळी अमरावती महानगरातील दोन्ही विसर्जनस्थळी डॉक्टरांसह रुग्णवाहिका उपलब्ध करुन दिली जाणार आहे. गणेश विसर्जनवेळी क्वचितप्रसंगी अपघात घडतो. अशावेळी वेळेत उपचार न मिळाल्यास कधीकाळी गणेश भक्ताच्या जीवावरही बेतते. त्यामुळे त्यांना तत्काळ उपचार व वैद्यक सेवा मिळावी म्हणून मुख्य विसर्जनस्थळी डॉक्टरांसह रुग्णवाहिका उपलब्ध करुन देण्याच्या सूचना लोकप्रतिनिधी व जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार ही व्यवस्था करण्यात आल्याचे सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुभाष ढोले यांनी ‘दिव्य मराठी’ ला सांगितले.

दरम्यान कुणाला दुखापत झाल्यास किंवा पाण्यात बुडाल्याने काही अडचण निर्माण झाल्यास रुग्णालयात तत्काळ निदान व उपचार केला जावा, यासाठी सर्व सरकारी व निमसरकारी (मनपा दवाखाने) रुग्णालयांमध्ये १० खाटांचा स्वतंत्र कक्ष राखीव ठेवण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तशा सूचना सर्व अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

आपत्तीवेळी ही आहे हेल्पलाइन
गणेश विसर्जनावेळी कोणतीही आपत्ती ओढवल्यास तत्काळ मदतकार्य पुरविता यावे म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयात मदत कक्ष उघडण्यात आला आहे. या मदत कक्षातून चोवीस तास मदत पुरवली जाते. त्यासाठी प्रत्येकी आठ तासांच्या हिशेबाने तीन शिफ्टमध्ये कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या मदत कक्षाचा दूरध्वनी क्रमांक ०७२१ २६६२०२५ असा आहे.

बातम्या आणखी आहेत...