आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रामपंचायत रणसंग्राम:आखतवाड्यात राखीव सरपंच पदासाठी उमेदवारच मिळेना; 2 वेळा निवडणूक जाहीर, पण अर्जच न आल्याने आरक्षण बदलणार!

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील ७६ ग्रामपंचायतींचे ११५ सदस्य आणि दोन सरपंचांसाठी आगामी १८ मे रोजी निवडणूक होत असून आखतवाड्याच्या (ता. तिवसा) सरपंचासाठी प्रशासनाची चांगलीच दमछाक होत आहे.

हे पद नागरिकांच्या मागास प्रवर्गातील महिलांसाठी राखीव आहे. परंतु या संवर्गाची एकही व्यक्ती गावात रहात नसल्याने दोनवेळा निवडणूक कार्यक्रम घोषित केल्यानंतरही कुणाचाच अर्ज प्राप्त झाला नाही. त्यामुळे ग्रामपंचायत अधिनियमातील तरतुदींनुसार आता त्या पदाचे आरक्षण बदलविले जाणार आहे.

वारंवार पद रिक्त रहात असल्याने किंवा इतर कारणाने ते रिक्त झाल्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील ७६ ग्रामपंचायतींची पोटनिवडणूक घोषित केली आहे. त्यानुसार गेल्या २ मे पर्यंत सदस्य व सरपंच पदासाठीचे अर्ज स्वीकारले गेले. परंतु आखतवाड्याच्या सरपंच पदासाठी अर्जच प्राप्त झाला नाही. त्यामुळे ते पद अद्यापही रिक्तच आहे.

त्यामुळे या पदासाठी आणखी एकदा निवडणूक कार्यक्रम घोषित केला जाणार आहे. दुसरीकडे अन्य एका सरपंचासाठी केवळ एकच अर्ज प्राप्त झाल्याने चांदूर बाजार तालुक्यातील सर्फापूरचे सरपंचपद अविरोध विजयी झाले आहे. हे पद अनुसूचित जमाती (एसटी) संवर्गातील महिलेसाठी आरक्षित होते. त्यासाठी फक्त एकच अर्ज प्राप्त झाला होता.

असे आहे आखतवाड्यासाठीचे सूत्र

अधिनियमातील तरतुदीनुसार ज्या प्रवर्गासाठी (नामाप्र महिला) ते पद रिक्त आहे. तेथे महिला ही अट न ठेवता ते आधी खुले केले जाईल त्यानंतरही योग्य उमेदवार न सापडल्यास दुसऱ्या टप्प्यात इतर प्रवर्गातील उमेदवाराला त्या पदासाठी अर्ज दाखल करण्याची मुभा दिली जाईल. प्रशासन सध्या त्यादृष्टीने तयारीला लागले आहे.

सात जणांचे अर्ज रद्दबातल

सदर निवडणुकीसाठी २ मेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. त्यानंतरच्या दुसऱ्या दिवशी अर्थात ३ मे रोजी छाननी पार पडली. छाननीदरम्यान तब्बल ७ उमेदवारांचे अर्ज नामंजूर करण्यात आले. अमरावती व दर्यापुर तालुक्यातील प्रत्येकी दोन तर चिखलदरा तालुक्यातील तीन उमेदवारांचे अर्ज नामंजूर करण्यात आले. अपूर्ण माहिती, जात पडताळणी प्रमाणपत्राचा अभाव आदी कारणे त्यासाठी पुढे करण्यात आली आहेत.