आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात कंटेनरची दुचाकीला धडक:तरुणीचा जागीच मृत्यू, नागपूर-औरंगाबाद महामार्गावरील भातकुलीजवळ घडली घटना

अमरावती2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावतीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. खड्डे चुकवण्याच्या प्रयत्नात दुचाकीला कंटनेरने ध़डक दिल्याने ड्यूटीवर जात असलेल्या 24 वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू झाला ही घटना नागपूर-औरंगाबाद महामार्गावरील भातकुलीजवळ शनिवारी (03 डिसेंबरला) घडली. भुमिका महादेव सोमोसे असे मृत तरुणीचे नाव आहे.

घटनेनंतर संतप्त नागरिकांनी रास्ता रोको केले. त्यामुळे दोन्ही बाजूने जवळपास 3 किमीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. मृतक ही माजी पं. स. सभापती महादेव सोमोसे यांची मुलगी आहे.

काय आहे घटना?

भूमिका ही बोरगाव धांदे येथील पोस्ट ऑफिसमध्ये कार्यरत होती. घटनेच्या वेळी ती दुचाकीने (एमएच 27/ सीटी 3192) आपल्या कामावर जात होती. दरम्यान भातकुलीनजिक मागून येणारा एचपी गॅसचा कंटेनर खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात उसळला आणि तो दुचाकीला धडकला. त्यात भूमिका कंटेनरच्या डाव्या चाकात येवून 30 फुटांपर्यंत फरफटत गेली. त्यात तिचा खांदा व चेहऱ्याचा पुर्ण चेंदामेंदा झाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांसह मंगरुळ दस्तगीर, तळेगाव दशासर व महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. धामणगाव रेल्वे येथील ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीअंती मृतक भूमिकावर शेंदुरजना खुर्द येथील स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

तीन तास केला रास्ता रोको

खड्ड्यांमुळे नेहमीच अपघातामध्ये नाहक बळी जात असल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी माजी आमदार विरेंद्र जगताप यांच्या नेतृत्वात सुमारे तीन तास चक्काजाम केला. त्यामुळे नागपूर व औरंगाबादकडून येणारी वाहतूक खोळंबली होती. परिणामी नागपूर-औरंबाद एक्सप्रेस हायवेवर दोन्ही बाजुने सुमारे 3 किमीपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या

या वर्षात गेला 36 जणांचा बळी

तालुक्यातील नागपूर-एक्स्प्रेस हायवे हा मृत्यूचा सापळा झाला आहे. जानेवारी महिन्यापासून आतापर्यंत या मार्गावर जवळपास 60 अपघात झाले आहेत. त्यात जवळपास 36 जणांना जीवाला मुकावे लागले आहे. ही संख्या फक्त तळेगाव दशासर पोलिस स्टेशन हद्दीतील आहे. या मार्गाने मुंबईला जाण्यासाठी कमी वेळ लागत असल्याने दिसवरात्र त्यावर वाहतूक सुरू असते. खड्ड्यांनी रस्त्यांची चाळण झाली असून ती वाहन चालकांच्या जीवावर उठत आहे.

बातम्या आणखी आहेत...