आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जलवाहिनी फुटली:अमरावतीसह बडनेरावासीयांना आजपासून 4 दिवस पाणी नाही!

अमरावती2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जलवाहिनी फुटल्यामुळे आगामी ४ दिवस पाण्याविना घालविण्याची वेळ पुन्हा एकदा अमरावती करांवर ओढवली आहे. सरत्या वर्षांत तिसऱ्यांदा असा प्रकार घडला असून, येत्या ८ डिसेंबरपर्यंत दुरुस्ती कार्य चालेल, असे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या (मजीप्रा) अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. ‘मजीप्रा’चे उपकार्यकारी अभियंता अजय लोखंडे यांनी तशी अधिकृत सूचना जारी केली असून दुरुस्ती कार्य सुरु झाल्याचेही म्हटले आहे.

आकस्मिकरित्या ओढवलेल्या या संकटामुळे अमरावती आणि बडनेरावासीयांची झोप उडाली असून चार दिवस पाण्याविना कसे भागवायचे, असा त्यांचा प्रश्न आहे. हिवाळा ऋतुत पाण्याचा वापर फारसा होत नाही, हे खरे असले तरी ६ डिसेंबरचे विविध कार्यक्रम आणि त्यानिमित्त निर्माण झालेली अतिरिक्त पाण्याची गरज यामुळे सर्वांची चिंता वाढली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे सरत्या वर्षांतील हा तिसरा प्रसंग आहे. यापूर्वी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दोन वेळा असा प्रसंग ओढवला होता. परिणामी मनपा व खासगी यंत्रणांमार्फत पाणी विकत घेण्याची वेळ जुळ्या शहरातील नागरिकांवर ओढवली होती. रविवारी सकाळी साडेअकरा ते बारा वाजेच्या दरम्यान बोरगाव फाट्यावरील ड्रीमलँड या मोठ्या कापडबाजारानजिक पाइपलाइन फुटली. हा पाइपलाइन २८ वर्षे जुनी असून, त्या काळातील पीएससी प्रकारातील आहे. त्यामुळे ती आतल्या आत घर्षणाने पातळ (थीन) झाली असून, ज्याठिकाणी फारच पातळ झाली, त्या ठिकाणी ती फुटते. गेल्या दोन वेळचा अनुभव असाच आहे. त्यामुळे मजीप्राने नवी पाइपलाइन लोखंडी करायचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला असून, आगामी २५ वर्षांची लोकसंख्या आधार मानून पाइपचा व्यासही दीडवरून दोन मीटरपर्यंत वाढवला यापूर्वी जूनच्या पहिल्या आठवड्यात पाइपलाइन फुटली होती. त्यामुळे ३ ते ५ जून या काळात पाणीपुरवठा बंद राहिला होता. परंतु दुरुस्ती कार्य पूर्ण झाल्याच्या दोन दिवसानंतर लगेच जुन्याच ठिकाणी पाइपलाइन पुन्हा फुटल्याने आठवडाभरासाठी पाणीपुरवठा बंद राहिला होता. त्यानंतर आज, रविवारी पाच महिन्याने पुन्हा तशीच वेळ ओढवली आहे. ही पाइपलाइन दीड मीटर (अर्थात पाच फूट) व्यासाची असून, ती कालबाह्य झाली आहे. तीचे आयुर्मान २५ वर्षांचे होते. त्यामुळे ती वारंवार फुटते. पाण्याच्या नेहमीच्या दाबामुळे ती अत्यंत जर्जर झाली असून ती पूर्णत: बदलणे हाच खरा व हुकमी पर्याय आहे.

अमरावती व बडनेरावासीयांना दिले जाणारे पिण्याचे पाणी मोर्शी तालुक्यातील सिंभोरा धरणातून आणले जाते. हे अंतर सुमारे ६५ किलोमीटर आहे. सध्या एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो. पाणी साठवून ठेवण्यासाठी पुरेशा टाक्या नसल्यामुळे काही भागात सकाळी तर काही भागात सायंकाळी पुरवठा केला जातो. एक दिवसाआड पाणी सोडण्यात येत असल्याने त्यांना रविवारी पाणी मिळाले असते. परंतु आता पाइप लाइनच फुटल्याने त्यांच्यावर पाच दिवसांसाठीची पर्यायी व्यवस्था करण्याची वेळ ओढवली आहे. लोकप्रतिनिधींचाही पाठपुरावा: कालबाह्य झालेली पाइपलाइन बदलण्यासाठी ‘मजीप्रा’ला स्थानिक लोकप्रतिनिधींचे ही पाठबळ मिळत आहे. गेल्यावेळी पाणी पुरवठा खंडित झाला, त्यावेळी नागरिकांचा हाहाकार उडाला होता. त्यामुळे खडबडून जागे झालेल्या सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी ‘मजीप्रा’वर धडक दिली होती.

गेल्या वेळी रहाटगाव, आता बोरगाव गेल्या जून महिन्यात दोन वेळा फुटलेल्या पाइपलाइनचा केंद्रबिंदू रहाटगाव होता. तर आता फुटलेल्या पाइपलाइनचा केंद्रबिंदू बोरगाव आहे. विशेष असे की गेल्यावेळी भरपूर पाणी वाया गेले होते. यावेळी मात्र पाइपलाइन फुटल्याचे कळताच सिंभोरावरुन सुरु असलेले पंपिंग तत्काळ बंद करण्यात आले. त्यामुळे फारसे पाणी वाया गेले नाही. ही पाइपलाइन मोर्शी-अमरावती या ५४ किलोमीटर लांबीच्या राज्य महामार्गाच्या कडेने अमरावतीत आणण्यात आली असून वाहतुकीमुळे जलवाहिनीवर कोणताही परिणाम होत नाही.

‘मजीप्रा’चे दोन प्रस्ताव पाइपलाइन बदलण्यासाठी ‘मजीप्रा’ने दोन प्रस्ताव तयार केले आहेत. एक प्रस्ताव ९९५ कोटी रुपयांचा असून तो अंमलात आणल्यास दिवसाआड २० तास पंपिंग करावे लागणार आहे. तर दुसरा प्रस्ताव ७०० कोटी रुपयांचा असून तो अंमलात आणल्यास दिवसाआड २४ तास पंपिंग करावे लागणार आहे. अर्थात ९९५ कोटी रुपयांचा प्रस्ताव अंमलात आणल्यास पाइपचे आयुर्मान वाढवण्यास मदत होणार असून, वीज बिलामध्येही बचत केली जाणार आहे. विशेष असे की हे दोन्ही प्रस्ताव पुढील २५ वर्षांची लोकसंख्या वाढ गृहीत धरुन तयार करण्यात आले आहे.

आता तरी लक्ष द्यावे पाइपलाइन बदलण्यासीठीचा प्रस्ताव सहा महिन्यांपूर्वीच राज्य सरकारकडे पाठवण्यात आला आहे. सध्या तो राज्य शासनाच्या उच्चाधिकार समितीच्या मंजुरी अधीन असून, तेथील प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तो केंद्र सरकारकडे पाठवला जाणार आहे. केंद्र सरकारने शहरी भागासाठी अमृत-दोन ही योजना लागू केली असून त्यात कालबाह्य झालेल्या जलवाहिन्या बदलवून घेण्याची तरतूद आहे. नेमक्या त्याच योजनेत बसणारा प्रस्ताव दोन प्रकारे स्थानिक कार्यालयाने तयार करुन पाठविला आहे. परंतु तो अजूनही पूर्णत्वास गेला नाही.

बातम्या आणखी आहेत...