आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबडनेराजवळ असलेल्या पाळा येथील वसुधाताई देशमुख फुड टेक्नॉलॉजी महाविद्यालयात बी.टेक. तृतीय वर्षाला शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी (दि. ३१) रात्री घडली. महाविद्यालयाचे काही शुल्क भरायचे होते, त्यामुळे परीक्षेदरम्यान त्याचा पेपर हिसकावून घेतला व त्याच नैराश्यातून त्याने आत्महत्या केल्याचा आरोप विद्यार्थ्याच्या नातेवाइकांनी महाविद्यालयावर केला आहे. या प्रकाराने चांगलीच खळबळ उडाली आहे.
अनिकेत अशोकराव निरगुळवार (२१, रा. रिधोरा, राळेगाव, यवतमाळ) असे मृत मुलाचे नाव आहे. अनिकेत शहरातील साईनगर भागातील अनुराधा कॉलनीमध्ये भाड्याची खोली करुन राहत होता. तो पाळा येथील वसुधाताई देशमुख फुड टेक्नॉलॉजी महाविद्यालयात बी.टेक. तृतीय वर्षाला शिकत होता. गुरुवारी महाविद्यालयात मिड टर्म परीक्षेमधील ‘क्वॉलिटी कंट्रोल’ विषयाचा अनिकेतचा पेपर होता. त्याचे १७ हजार रुपये महाविद्यालयात भरणे बाकी होते. त्यामुळेच परीक्षा सुरू असताना अनिकेतचा पेपर महाविद्यालयात एका प्राध्यापिकेने हिसकावून घेतला.
या प्रकारामुळे तो निराश झाला व रडला होता. ही बाब त्याने फोनद्वारे गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास मला सांगितली होती. त्यावेळी त्याला मी सांगितले की, उद्या आपण फीचे पैसे भरुन देवू. मात्र, रात्री दहा वाजेच्या सुमारास बडनेरा पोलिसांचा ‘तुमच्या मुलाने आत्महत्या केली’, असा निरोप मला मिळाला. त्याने पेपर हिसकावल्याच्या नैराश्यातून आत्महत्या केली असल्याचा आरोप अनिकेतचे वडील अशोक गुलाबराव निरगळवार यांनी केला आहे. दरम्यान, हा प्रकार समोर येताच शुक्रवारी सकाळी अनिकेतच्या वडिलांसह अन्य नातेवाइक तसेच भाजपचे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुलकर्णी हे बडनेरा पोलिस ठाण्यात पोहोचले होते. या प्रकरणात दोषींवर कारवाईची मागणी त्यांनी केली आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.