आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमरावतीकडून बडनेराकडे जाणाऱ्या एका भरधाव कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात शहरातील एका अठरा वर्षीय तरुणासह १७ वर्षीय मुलीचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास अमरावती ते बडनेरा एक्सप्रेस हायवेवरील कोंडेश्वर टी पॉइंटवर घडली. अपघातात कारचा पूर्णत: चुराडा झाला.
आदित्य अखिलेन्द्र विश्वकर्मा (१८, रा. शिवाजीनगर, अमरावती) आणि १७ वर्षीय मुलगी असे अपघातात मृत्यूमुखी पडले आहेत. आदित्य हा शहरातील नरसम्मा महाविद्यालयाचा बारावीचा तर मुलगी श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयात विज्ञान शाखेची अकराव्या वर्गातील विद्यार्थिनी होती. हे दोघेही शहरातील एकाच परिसरात राहत होते.
दोघे होते मित्र
सोमवारी सकाळी सात वाजताच्या सुमारास मुलीच्या वडिलांनी तिला घरून महाविद्यालयात सोडून दिले. मात्र, साडेनऊ वाजताच्या सुमारास त्यांना मुलीचा बडनेराजवळ अपघात झाल्याची माहिती मिळाली. आदित्य व ही मुलगी मित्र होते, अशी चर्चा आहे. दरम्यान ते कशासाठी बडनेरा भागात गेले, याबाबत कोणतीही माहीती समोर आली नाही. अपघाताची माहिती मिळताच बडनेरा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. यावेळी दोघांनाही रक्तबंबाळ व गंभीर अवस्थेत इर्विन रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी तपासणीअंती दोघेही मृत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
असा झाला अपघात
आदित्य कार चालवित असताना सुरुवातीला एका ट्रकला कारचा कट लागला. त्यामुळे भरधाव कार अंनियंत्रित झाली व दुसऱ्या ट्रकवर जावून आदळली. त्यामुळे भरधाव कार रस्त्याच्या कडेला जावून आदळली. यावेळी कारने एक - दोन पलटी घेतल्या. त्यामुळे आदित्य व १७ वर्षीय मुलगी दोघांनाही डोके, हात व शरीराच्या विविध अवयवांना जबर मार बसल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे घटनास्थळावर जमलेल्या नागरिकांनी सांगितले.
परस्परविरोधी तक्रारी
आदित्य व मुलीचा अपघातात मृत्यू झाल्याची माहीती मिळताच दोघांच्याही नातेवाईकांनी इर्विनमध्ये गर्दी केली. यावेळी दोघांचेही मृतदेह पाहून नातेवाईक प्रचंड संतापले. तसेच आमच्या मुलीला मुलानेच कॉलेजमधून नेले. त्यामुळे तिचा अपघातात मृत्यू झाला, असा आरोप करून मुलीचे नातेवाईक अधिकच संतप्त झाले होते. या कारणावरून नातेवाईकांच्या दोन्ही गटात चांगलीच हमरीतुमरी व काही वेळानंतर धक्काबुक्की झाली. यावेळी पोलिसांनी मध्यस्थी केली. या प्रकरणी मुलीच्या वडिलांनी बडनेरा पोलिसात, तर मुलाच्या नातेवाईकांनी कोतवाली पोलिसात तक्रार दिली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.