आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना धोकादायक वळणावर:अमरावती, अचलपूर तालुक्यात संपूर्ण लॉकडाऊन तर जिल्ह्यात सायंकाळी 5 पर्यंत बाजारपेठ सुरू राहणार

अमरावती7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जिल्ह्यात उद्यापासून आठवडाभराचा लॉकडाऊन!

अमरावती जिल्ह्यात कोरोना पुन्हा धोकादायक वळणावर पोहोचला आहे. त्यामुळे मंगळवार, दि.२३ फेब्रुवारीपासून आठवडाभराचा संपूर्ण लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. या काळात उद्योग आणि दवाखाने वगळता शासकीय व निमशासकीय कार्यालये, बाजारपेठ आदी सर्व आस्थापना बंद ठेवल्या जाणार आहेत. किराणा, धान्य, भाजीपाला, दुध यासारख्या अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी विशिष्ट वेळेची मुभा देण्यात आली असून अमरावतीसह अचलपूर तालुक्यातही संपूर्ण लॉकडाऊन राहणार अाहे. त्याचवेळी जिल्ह्याच्या इतर भागात सायंकाळी ५ पर्यंतच बाजारपेठ सुरु ठेवण्याचे आदेश बजावण्यात आले आहेत.

जिल्ह्याच्या पालकमंत्री अॅड. यशोमती ठाकूर यांनी रविवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोनाचा आढावा घेतला. विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांच्यासह जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जिल्हा परिषदेचे सीइओ अमोल येडगे, पोलिस आयुक्त डॉ. आरती सिंह, जिल्हा पोलिस अधीक्षक हरि बालाजी, मनपा आयुक्त प्रशांत रोडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, िजल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले आदी यावेळी उपस्थित होते. या आढाव्यानंतर पालकमंत्री व आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांनी माध्यमांशी संवाद साधला. पालकमंत्री म्हणाल्या, राज्य शासन किंवा प्रशासन अजिबात लॉकडाऊनच्या बाजूने नाही. ही वेळ येऊच नये, असे आम्ही वारंवार सांगत होतो. परंतु दररोज वाढणारी रुग्णसंख्या बघता हा अप्रिय निर्णय घेणे आवश्यक झाले आहे. परिणामी सोमवारी दिवसभराचे दळणवळण सुरु ठेऊन रात्री ८ वाजेपासून आठवडाभरासाठी कडेकोट बंद (लॉकडाऊन) पाळला जाणार आहे. या बंद दरम्यान सर्वांनी नियमांचे पालन करावे. ते मोडल्यास संबंधितांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. तत्पूर्वी पालकमंत्र्यांनी सर्व यंत्रणाप्रमुखांशी बोलणी केली. त्यांच्या अडी-अडचणी समजून घेतल्या.

१९ फेब्रुवारीला शिवजयंतीची सार्वजनिक सुटी होती. त्यानंतर शनिवार-रविवार हे दोन दिवस साप्ताहिक सुटीचे असल्याने सलग तीन दिवस शासकीय, निमशासकीय कार्यालये बंद होती. या काळात सामान्य नागरिकांची अनेक प्रशासकीय कामे खोळंबली. ही वस्तुस्थिती लक्षात घेता उद्या, सोमवार, २२ फेब्रुवारी रोजी सर्व प्रकारचे दळणवळण सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानंतर मंगळवारपासून संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. लॉकडाऊनच्या काळात किराणा, धान्य, भाजीपाला, दुध व सरकारी स्वस्त धान्याची दुकाने सकाळी ८ ते दुपारी ३ या वेळात सुरु ठेवली जाणार आहेत.

का घ्यावा लागला कठोर निर्णय ?

‘मिशन िबगीन अगेन’नुसार मध्यंतरीच्या काळात देण्यात आलेली मुभा आणि होम आयसोलेशनचा पर्याय घेत घरी राहिलेल्या कोरोनाबाधितांनी मोडलेले नियम यामुळे अमरावती शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा वेगाने फैलाव झाला. परिणामी गेल्या आठवडाभरापासून रोज पाचशे ते सातशे नव्या रुग्णांची भर पडते आहे. हीच स्थिती कायम राहिली तर येत्या काळात रुग्णांना खाटा अपुऱ्या पडतील, अशी स्थिती आहे. त्यामुळे मानवी साखळी तत्काळ खंडित करणे आवश्यक होते. त्यासाठी प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

अमरावती शहरात पुन्हा ६ नवे कंटेनमेंट झोन घोषित

अमरावती शहरातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव तसेच ज्या परिसरात पाॅझिटिव्ह रुग्णांची संख्या जास्त अाहे, असे आज (दि.२१) ६ नवे कंटेनमेंट झोन घोषित करण्यात आले आहेत. यात १. कलोती नगर, २. वनश्री काॅलनी, साधना काॅलनी, ललित काॅलनी (तिन्ही एकत्रितपणे), ३. न्यू काॅलनी, ४. वडाळी, ५. एसआरपीएफ कॅम्प, ६. दस्तूर नगरचा समावेश आहे.

एका उपजिल्हाधिकाऱ्यालाही ग्रासले कोरोनाने

जिल्हाधिकारी यांच्या अनुपस्थित जबाबदारी सांभाळणाऱ्या एका उपजिल्हाधिकाऱ्यालाही कोरोनाची लागण झाली. याशिवाय पोलिस विभागातील एका सर्वोच्च अधिकाऱ्यालाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती असून, कामगार राज्यमंत्री यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. तत्पूर्वी दोन माजी पालकमंत्री, तीन आमदार व जि.प. च्या काही पदाधिकाऱ्यांनाही कोरोनाने कवेत घेतले होते.

दिवसभरात कोरोनाचे ७०९ रुग्ण; तिघांचा मृत्यू

जिल्ह्यात दिवसभरात ७०९ नवे रुग्ण नोंदले गेले. एकूण कोरोनाबाधितांची संख्या २९ हजार ५२४ वर पोहोचली. तीन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये टोपेनगर येथील ९० वर्षीय पुरुष आणि पठाण चौकातील ६५ वर्षीय महिलेसह खामगाव येथील एका ५३ वर्षीय महिलेचा समावेश आहे. अमरावतीनिवासी इतर दोन कोरोनाबाधितांनी जिल्हा कोविड रुग्णालयात अंतिम श्वास घेतला.

रुग्णसंख्येने मोडला सप्टेंबरचा विक्रम

गेल्या वर्षभरात कोरोना फार वेगाने वाढला. मे ते सप्टेबर २०२० या काळात तो शिखरावर होता. तर एकूण कालखंडात सप्टेबर महिन्यात सर्वाधिक ७ हजार नव्या रुग्णांची नोंद झाली होती. यावर्षी फेब्रुवारीने मात्र त्याहीपलिकडे उडी घेतली असून या महिन्याच्या पहिल्या २१ दिवसांची संख्या ८ हजाराच्या आसपास पोहोचली आहे. ही निश्चितच चिंताजनक बाब असून त्यामुळेच मानवी साखळी तोडणे आवश्यक असल्याचे मत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम यांनी व्यक्त केले.

शहरातील रस्त्यांवर शुकशुकाट

आधीच्या निर्णयानुसार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज, रविवारी दिवसभराचा लॉकडाऊन घोषित केला होता. रविवार असल्यामुळे तशीही बाजारपेठ बंदच असते. परंतु शहराच्या काही भागात ‘सण्डे मार्केटिंग’च्या नावाखाली रस्त्याच्या कडेला दुकाने थाटली जातात. लॉकडाऊन असल्यामुळे आज मात्र तिही बंद होती. परिणामी शहराच्या सर्वच चौक आणि रस्त्यावर नगण्य वर्दळ दिसून आली.

बातम्या आणखी आहेत...