आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमरावतीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चार दिवसांपासून घरून बेपत्ता असलेल्या 28 वर्षीय अभियंता तरुणीचा मृतदेह शनिवारी (दि. 3) सकाळी घराच्या टेरेसवर असलेल्या वॉटर टँकमध्ये आढळला आहे. ही घटना गाडगे नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रत्नप्रभा कॉलनीमध्ये घडली. अश्विनी गुणवंतराव खांडेकर असे मृत्यू तरुणीचे नाव आहे.
अश्विनी 30 नोव्हेंबरपासून घरून बेपत्ता होती. घरातून निघण्यापूर्वी मैत्रिणीकडे जाते, असं तिने सांगितले होते. मात्र मैत्रिणीकडे कुटुंबीयांनी शोध घेतला असता ती मैत्रिणीकडे नसल्याचे समोर आले होते. दरम्यान त्याच दिवशी अश्विनीचा भाऊ आशिष यांनी गाडगेनगर पोलिस ठाणे गाठून अश्विनी बेपत्ता असल्याबाबत तक्रार नोंदवली होती. त्यामुळे मागील चार दिवसापासून कुटुंबीय आणि पोलिस अश्विनीचा शोध घेत होते.
टॅंकमधून दुर्गंधी
दरम्यान, शनिवारी सकाळी कुटुंबीयांना पाण्यातून दुर्गंधी येत असल्याचे लक्षात आले, त्यामुळे कुटुंबीयांनी टेरेसवर असलेल्या वॉटर टॅंकमध्ये जाऊन पाहिले, त्यावेळी त्यांना अश्विनीचा पाण्यावर तरंगत असलेला मृतदेह दिसून आला. पोलिसांनी तात्काळ ही माहिती गाडगे नगर पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळतात ठाणेदार आसाराम चोरमले, डीसीपी सागर पाटील, एसीपी पुनम पाटील तसेच अन्य पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठले. मृतदेहाची पाहणी करून मृतदेह टँकमधून बाहेर काढण्यात आला. दरम्यान अश्विनीची हत्या की, तीने आत्महत्या केली, याबाबत खुलासा झाला नव्हता. पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे.
एक हजार लिटरची वॉटर टँक
अश्विनीचा मृतदेह असलेली वॉटर टॅंक ही 1 हजार लिटर क्षमतेची आहे. त्याची उंची पाच फूट असून पोलिसांनी पाहिले असता त्याचे झाकण उघडून होते. त्यामुळे अश्विनीने त्यामध्ये उडी घेऊन आत्महत्या केली किंवा कसे, याबाबत तूर्तास काहीही समोर आले नव्हते.
अद्यापही कारण अस्पष्ट
तरुणीचा मृतदेह वॉटर टँकमध्ये तरंगताना मिळून आला. आम्ही मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरिय तपासणीसाठी पाठवला आहे. शवविच्छेदन झाल्यानंतर डॉक्टरांकडून प्राथमिक अहवाल प्राप्त होईल. त्यानंतर मृत्यूचे नेमके कारण समोर येईल. त्याचवेळी ही आत्महत्या आहे की, अन्य काही याबाबत सांगता येईल.
- आसाराम चोरमले, ठाणेदार गाडगे नगर.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.