आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमरावती ते बडनेरा एक्सप्रेस हायवेलगतच्या वडुरा जंगल परिसरात अभियांत्रिकीला शिकणाऱ्या एका १९ वर्षीय तरुणीचा अतिशय निर्दयीपणे गळा चिरुन खून झाला असून अभियांत्रिकीलाच शिकणारा १९ वर्षीय तरुण त्याच ठिकाणी गंभीर अवस्थेत पडून होता. हा थरार बडनेरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी (दि. १०) सकाळी समोर आला.
संजना शरद वानखडे (१९, रा. परतवाडा) असे मृत तरुणीचे तर सोहम गणेश ढाले (१९, रा. परतवाडा) असे गंभीर जखमी तरुणाचे नाव आहे. सोहम ढालेविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
ब्रेकअपच्या कारणातून हत्याकांड
‘ब्रेकअप’च्या कारणातून हे हत्याकांड घडले असून, मृत तरुणीचा वर्षभरापासून मित्र असलेल्या अभियांत्रिकीच्याच तरुणाने हे कृत्य केल्याची तक्रार प्राप्त झाल्यामुळे पोलिसांनी त्याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. हे दोघेही बडनेरा येथील न्यू राम मेघे इंजिनिअरिंग कॉलेजला ‘आयटी’च्या पहिल्या वर्षाचे विद्यार्थी आहेत.
तरुणीच्या गळ्यावर पाच वार, निर्दयीपणे चिरला गळा
तरुणीच्या गळ्यावर पाच वार असून ते वार कटरने केल्याप्रमाणे दिसत आहेत. दरम्यान, तरुणीने मारेकऱ्याचा प्रतिकार केला असून, त्यामध्ये तिच्या बोटांनाही गंभीर दुखापत झाली आहे. अतिशय क्रूरतेने तरुणीचा खून करण्यात आला आहे. तरुणीचे वडील निवृत्त पोलिस अंमलदार असून ते दोन महिन्यांपूर्वीच अमरावती ग्रामीण पोलिस दलातून सेवानिवृत्त झाले आहेत, अशी माहिती बडनेरा पोलिसांनी दिली.
पेनड्राइव्ह, छायाचित्रे परत करायचे ठरले होते...
संजनाला सोहमसोबत संबंध ठेवायचे नव्हते, त्यामुळे ती ‘ब्रेकअप’ मागायची दरम्यान मंगळवारी रात्री त्यांचे भेटायचे ठरले, त्याचवेळी सोहमकडे असलेला तिचा पेनड्राइव्ह व छायाचित्र परत करायचे असेही ठरले होते. ठरल्याप्रमाणे दोघेही भेटले. दरम्यान मंगळवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास त्यांच्यात वाद झाला आणि वादातून सोहमने संजनाच्या गळ्यावर कटरने सपासप वार केले. त्याचवेळी त्याने स्वत:ही वार करुन घेतले. त्याने पेपर कटरने हे वार केले आहे. त्याने पेपर कटर सोबत बाळगले, यावरुन हा सोहमचा पूर्वनियोजित कट असल्याचे पोलिसांनी सांगितले.
सखोल तपास सुरू
मृत तरुणीच्या नातेवाइकाने दिलेल्या तक्रारीवरून सोहम ढालेविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणाचा सर्वच बाजूने आम्ही सखोल तपास सुरू केला आहे. नितीन मगर, ठाणेदार, बडनेरा.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.