आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तलवारीच्या धाकावर दरोडा, 13.55 लाखांची लूट:नांदगाव खंडेश्वर ते धानोरा गुरव मार्गावरील घटना, वाहन आडवे लावून दगडफेक

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील किराणा, ड्रायफ्रुट मालाची वसूली करुन अमरावतीकडे येताना मुनीमाचे चारचाकी वाहन दरोडेखोरांनी अडवले. त्या वाहनातील तिघांना चाकू व तलवारीचा धाक दाखवला तसेच दगडफेक करुन गाडीच्या काचा फोडत 13.55 लाख रुपयांची रक्कम पाच दरोडेखोरांनी पळवली. हा दरोडा नांदगाव खंडेश्वर ते धानोरा गुरव गावादरम्यान वर्षाच्या पहील्याच दिवशी अर्थात 1 जानेवारीला रात्री 11 वाजताच्या सुमारास टाकला गेला.

अमरावती शहरातील व्यावसायिक हाजी शादाब हाजी हरुण हे किराणा, ड्रायफ्रुटचे ठोक व्यापारी आहेत. ते यवतमाळ जिल्ह्यातही मालाचा पुरवठा करतात. त्यामुळे नेहमीच यवतमाळात माल पोहचवणे व मालाची रक्कम घेवून येणे, या कामासाठी काही कामगार व एक बोलेरो पिकअप (एम. एच 27 बीएक्स 4503) हे मालवाहू वाहन त्यांच्याकडे आहे. रविवारी (दि. 1) दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास त्यांच्या वाहनावरील चालक इम्रान बेग गफ्फार बेग (38, रा. नवीवस्ती, बडनेरा), वसुलीचे काम करणारे सुधीर लक्ष्मण सोळंके आणि अजीज अली रज्जाक अली हे तिघे यवतमाळला बोलेरो वाहनाने गेले होते.

यवतमाळला दिवसभर त्यांनी ज्या व्यापाऱ्यांना माल द्यायचा होता तो दिला, त्याचवेळी सुधीर साेळंके यांनी मालाची वसूली केली. दरम्यान रात्री साडेआठ ते नऊ वाजताच्या सुमारास ते यवतमाळातून अमरावती येण्यासाठी निघाले. यावेळी वसुलीची 13 लाख 50 हजार रुपयांची रक्कम बोलेरो वाहनात चालकाच्या बाजूला असलेल्या लोखंडी पेटीत ठेवली.

नांदगाव खंडेश्वरपासून काही अंतरावर समोर आल्यानंतर त्यांच्या बोलेरोला एका पांढऱ्या रंगाच्या इंडीका व्हिस्टा कारने ओव्हरटेक केले. ओव्हरटेक केल्यानंतर त्या कारचालकाने बोलेरो वाहनाला रस्त्याच्या एका कडेला दाबले, त्यामुळे बोलेरा रस्त्याच्या खाली उतरली, त्याचवेळी व्हिस्टा कार बाेलोरोसमोर उभी केली. त्यामधून चार दरोडेखोर उतरले, त्यांनी सर्वप्रथम बोलेरोच्या काचा फोडल्या.

दरोडेखोरांकडे चाकू व एकाकडे तलवार होती. त्यांनी तिघांनाही धाक दाखवून रक्कम मागितली. दरोडेखोरांनीच रकमेचा शोध घेतला आणि रक्कम घेवून बडनेराच्या दिशेने पोबारा ठोकला. या घटनेची माहीती तत्काळ नांदगाव खंडेश्वर पोलिसांना देण्यात आली. घटनेचे गांभिर्य लक्षात घेता पोलिस घटनास्थळी पोहचले मात्र तोपर्यंत दरोडेखोर पसार झाले होते. या प्रकरणात बोलेरो चालक इम्रान बेग गफ्फार बेग यांच्या तक्रारीवरुन पाच जणांविरुध्द दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे. वर्षाच्या पहील्याच दिवशी हा गुन्हा घडल्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. नांदगाव खंडेश्वर पोलिसांसह एलसीबीची विवीध पथकं दरोडेखोरांचा शोध घेत आहेत.

बातम्या आणखी आहेत...