आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिरखाजी खोब्रागडेंच्या मुलाचा दावा:बाबासाहेबांच्या अस्थी छापाणी यांनी नव्हे माझ्या वडिलांनीच आणल्या; काँग्रेसच्या मंचावरील माहिती खोटी

अमरावती2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवीत्र अस्थी रामजी छापाणी यांनी नव्हे तर माझे वडील पिरखाजी खोब्रागडे यांनीच नया अकोला येथे आणल्या. सहा डिसेंबरच्या काँग्रेसच्या मंचावरुन छापानी यांनी दिलेली माहिती तद्दन खोटी आहे, त्यामुळे त्यांनी व आयोजक या नात्याने काँग्रेसने माफी मागावी, अशी मागणी पिरखाजी खोब्रागडे यांचे सुपुत्र गौतम व पत्नी शांताबाई खोब्रागडे यांनी केली आहे.

काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष तथा माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, माजी पालकमंत्री यशोमती ठाकूर व जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांच्या उपस्थितीत मंगळवारी नया अकोला येथे अभिवादन यात्रा पार पडली. या यात्रेदरम्यान नया अकोला येथे अभिवादनाचा कार्यक्रमही झाला. त्या कार्यक्रमाला पिरखाजी खोब्रागडे यांच्यासोबत त्यावेळी मुंबईत गेलेले रामजी छापाणी हेही उपस्थित होते. त्यांनी यावेळी बोलताना वरील माहिती दिली होती. परंतु ती निखालस खोटी असून श्रेय घेण्यासाठी ते तसे बोलत आहेत, असे गौतम खोब्रागडे यांचे म्हणणे आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अंत्यविधीला पिरखाजी खोब्रागडे, रामजी छापाणी व आणखी एक सहकारी असे तिघे जण गेले होते. हे तिघेही त्यावेळी आठवी-नववीत शिकत असल्याने अमरावतीच्या वसतिगृहात रहात होते. या बाबीशी खोब्रागडे कुटुंबीय सहमत आहे. परंतु मुंबईत गेल्यानंतर तेथील अंत्यविधीच्या गर्दीत यांची फाटाफूट झाली. त्यामुळे पिरखाजी व इतर दोघे वेगवेगळे अमरावती पोहोचले. येताना पिरखाजी यांनी बाबासाहेबांच्या मूठभर अस्थी सोबत आणल्या होत्या.

गावात पोहोचल्यानंतर त्यांनी या बाबीची माहिती आई-वडिलांसह गावातील काही प्रतिष्ठित नागरिकांना दिली. त्यांनी त्या अस्थी विधीवत दफन करुन त्यावर छोटासा चबुतरा बांधला. तेव्हापासून त्या ठिकाणी विशिष्ट दिवशी बाबासाहेबांना अभिवादन केले जाते. मध्यंतरीच्या काळात ही बाब अधिक स्पष्ट झाल्याने शासनाने त्या जागेला क वर्ग तिर्थस्थळाचा दर्जा दिला असून ते विकसित करण्यासाठी निधीही दिला आहे. यावेळी पिरखाजी यांचे समकालीन मित्र किसनराव वासनिक, गावकऱ्यांचे प्रतिनिधी मोहनदास मेश्राम, अजाबराव मोहोड, शांताबाई सहारे, विद्या खोब्रागडे, भागरथाबाई राऊत, सुशिलाबाई राऊत आदी मान्यवर उपस्थित होते.

हे आहेत अनुत्तरित प्रश्न

दरम्यान मंगळवारच्या अभिवादन यात्रेच्या समारोप कार्यक्रमात रामजी छापाणी यांनी त्या अस्थी आम्ही दोघेमिळून आणल्या असून अमरावतीत पोहोचल्यानंतर मी त्या पिरखाजीच्या स्वाधीन केल्या, असा उल्लेख केला आहे. मग छापाणी एवढे दिवस गप्प का होते, गेल्या अनेक वर्षांपासून तेथे दरवर्षी कार्यक्रम घेतला जात असताना ते कधीही कोणत्याच कार्यक्रमाला का आले नाहीत, असे प्रश्न उपस्थित करून छापाणी आता जाणीवपूर्वक खोटे बोलत आहेत, असे खोब्रागडे कुटुंबीयांचे म्हणणे आहे.

बातम्या आणखी आहेत...