आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासंतनगरी म्हणून ओळख असलेल्या शेगावचा सर्वांगीण विकास, जागतिक किर्तीच्या लोणार सरोवराची योग्यप्रकारे जपणूक तसेच पाचही जिल्ह्यातील महसूलच्या प्रश्नांना प्राधान्य देणार असल्याचे नवनियुक्त विभागीय आयुक्त निधी पांडे यांनी स्पष्ट केले.
निधी पांडे यांनी आज, शनिवारी दुपारी अमरावतीत पोहचून विभागीय आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारली. यादरम्यान ‘दिव्य मराठी’ने त्यांच्याशी संपर्क साधला. ‘येथे बराच बदल झाला आहे’ हे अमरावती शहराबद्दलचे पहिले वाक्य उच्चारून त्यांनी मी संत, महंत, महर्षीच्या भूमीत आली, याचे मला समाधान असल्याचे स्पष्ट केले. त्यांच्या मते अमरावती विभागातील महसूलची चमू चांगली असून पश्चिम विदर्भातील वेगवेगळ्या खात्याचे अधिकारीही फार छान असल्याचे निरीक्षण त्यांनी नोंदविले.
2001 च्या तुकडीच्या सनदी अधिकारी असलेल्या निधी पांडे यांचे अमरावतीशी जुने नाते आहे. नोकरीचा शुभारंभ (प्रोबेशन) त्यांनी याच ठिकाणाहून केला होता. त्यामुळे या शहराबद्दल त्यांना वेगळीच आपुुलकी आहे. चर्चेदरम्यान त्यांनी अंबादेवी, एकविरादेवी, संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, तपोवनचे शिल्पकार दाजीसाहेब पटवर्धन, देशाचे पहिले कृषी मंत्री डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख आदींचा नामोल्लेखही केला. दरम्यान सद्या मार्च महिना सुरु असल्याने महसूलचे मुद्दे तसेच लोणार येथील जागतिक किर्तीचे सरोवर आणि संत गजानन महाराज यांची भूमी असलेल्या शेगाव विकास आराखड्याला प्राधान्य देणार असल्याचे सांगितले.
आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर उपायुक्त संजय पवार, गजेंद्र बावणे, अजय लहाने, सहायक आयुक्त विवेकानंद काळकर, मनपा आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर, अमरावती एसडीओ गानथन, तहसीलदार वैशाली पाथरे, स्वीय सहायक बुटे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. येथील विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे हे तीन दिवसांपूर्वी निवृत्त झाले. त्यांच्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर निधी पांडे यांची नियुक्ती झाली आहे. दरम्यानच्या काळात या पदाची सूत्रे जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्याकडे सोपविण्यात आली होती.
फुलांचा असाही गौरव
विभागीय आयुक्त म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर निधी पांडे यांची शहरातील अनेक उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांना फुलांचे गुच्छ भेट म्हणून देण्यात आले. अगदी थोडक्या वेळात त्यांच्या दालनात गुच्छांची बरीच गर्दी झाली होती. दरम्यान स्नेह भेट म्हणून मिळालेले हे पुष्पगुच्छ तसेच पडून राहू देण्यापेक्षा त्यांनी तपोवन येथील कुष्ठबंधूंना भेट दिले. निधी पांडे यांनी स्वत: तेथे पोहचून कुष्ठ बांधवांच्या आनंदात भर घालण्यासोबतच फुलांचाही गौरव वाढविला. त्यांच्या या कृतीचे अनेकांनी कौतुक केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.