आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठी पत्रकारितेचे कार्य अतुल्य, देशाचा गौरव वाढविणारे:आयआयएमसीचे महासंचालक प्रा. डॉ. संजय द्विवेदी यांचे प्रतिपादन

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

प्रादेशिक स्तरावर लोकशाहीला विशाल वटवृक्षामध्ये रूपांतरित करण्यासाठी भाषिक पत्रकारितेने नेहमीच योगदान दिले आहे. भारतासारख्या बहूसांस्कृतिक आणि बहूभाषिक देशात हे योगदान अधिक महत्वपूर्ण ठरते. त्यामुळे मराठी पत्रकारितेचे कार्य हे अतुल्य असून देशाचा गौरव वाढविणारे आहे, असे मत भारतीय जनसंचार संस्थानचे (आयआयएमसी) महासंचालक प्रा. डॉ. संजय द्विवेदी यांनी व्यक्त केले.

भारतीय जनसंचार संस्थानच्या अमरावती विद्यापीठ परिसरातील पश्चिम क्षेत्रीय केंद्राच्यावतीने मराठी पत्रकारिता दिनानिमित्त भौतिकशास्त्र विभागाच्या सभागृहात ‘संपादक संवाद’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ‘मराठी पत्रकारितेचे बदलते स्वरूप’ या विषयावर मुख्य वक्ता म्हणून ते बोलत होते.

आयआयएमसीच्या स्थानिक शाखेचे प्रमुख प्रा. डॉ. वीरेंद्रकुमार भारती यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या कार्यक्रमाला नागपूर येथील ज्येष्ठ पत्रकार श्रीमंत माने व गजानन निमदेव, विद्यापीठाच्या मराठी व हिंदी भाषा विभागप्रमुख प्रा. डॉ. मोना चिमोटे उपस्थित होत्या.

पुढे बोलताना प्रा. डॉ. द्विवेदी म्हणाले, भारतीय भाषा या सामान्यांशी संवाद साधण्याच्या आणि त्यांना न्याय मिळवून देणाऱ्या भाषा आहेत. ही भूमिका लक्षात घेऊन वाटचाल केल्याने मराठीने जागतिक स्तरावर नावलौकिक मिळविला आहे. या कार्यात मराठी पत्रकारितेचे योगदान हे मोलाचे आहे. मराठी पत्रकारितेने भाषेला समृद्ध करण्या सोबतच जनसामान्याला न्याय मिळवून देण्याचे कार्य केले आहे. मराठी पत्रकारितेच्या प्रेरणेतूनच हिंदी पत्रकारितेचा उदयदेखील झाल्याचे प्रा. डॉ. द्विवेदी यांनी यावेळी सांगितले.

श्रीमंत माने म्हणाले, विद्यार्थ्यांनी ज्ञानवृद्धीसाठी आपला जास्तीत जास्त वेळ वापरावा. भाषिक कौशल्ये आत्मसात करावी. उत्तम वाचन, मुबलक शब्दसंग्रह, नव-नवीन शिकण्याची तयारी आणि रिस्क घेण्याची क्षमता तुम्हाला परिपूर्ण बनविते. हे युग प्रचंड स्पर्धेचे आहे. यात टिकण्यासाठी आपल्या आकलनाची गती वाढवावी लागेल. भाबळे आणि रोमँटिक राहून चालणार नाही. यश प्राप्तीसाठी प्रॅक्टिकली विचार करावा लागेल असा सल्लादेखील त्यांनी यावेळी विद्यार्थांना दिला. गजानन निमदेव म्हणाले, पत्रकारितेच्या क्षेत्रात भाषा व्याकरणाला अधिक महत्व आहे. परिणामकारक संवादासाठी भाषा महत्वाची असून विद्यार्थ्यांनी यासाठी भरपूर तयारी करावी. सोबतच बोली भाषेचा दर्जा वाढविण्यासाठीदेखील प्रयत्न करावे. पूर्वीच्या आणि आताच्या पत्रकारितेचे स्वरूप बदलले आहे याचा विचार करून विद्यार्थांनी त्या दिशेने सक्षम व्हावे. पेड न्युज आणि येलो पत्रकारिते पासून विद्यार्थांनी सावध राहावे. क्षेत्रीय संचालक प्रा. डॉ. वीरेंद्रकुमार भारती यांनी अध्यक्षीय संबोधन केले. यावेळी प्रा. डॉ. मोना चिमोटे यांचेही मनोगत झाले. प्रास्ताविक डॉ. विनोद निताळे यांनी केले. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते संत गाडगे बाबा आणि बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. संचालन प्रा. अनिल जाधव यांनी तर आभार डॉ. राजेश कुशवाहा यांनी मानले.

बातम्या आणखी आहेत...