आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावतीत निवडणुकांची रणधुमाळी उद्या थंडावणार:ग्रामपंचायत प्रचाराचा शेवटचा दिवस; 48 तासानंतर 257 गावात मतदान

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील 257 ग्रामपंचायतींची निवडणूक अवघ्या काही तासांवर आली आहे. दरम्यान या निवडणुकीसाठीचा जाहीर प्रचार उद्या, शुक्रवार, 16 डिसेंबर रोजी सायंकाळी 5.30 वाजता संपुष्टात येणार आहे. त्यामुळे शुक्रवारी सायंकाळनंतर कुणालाही जाहीर सभा घेता येणार नाही. त्याचवेळी सार्वजनिक ठिकाणी चौकसभा घेऊन फेरीही काढता येणार नाही.

आगामी 18 डिसेंबर रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळात सदर ग्रामपंचायतींसाठी मतदान घेतले जाणार आहे. त्यासाठी 835 मतदान केंद्रांची घोषणा करण्यात आली असून संवेदनशील मतदान केंद्रांसाठी अतिरिक्त पोलिस कुमकही तैनात ठेवली जाणार आहे. या निवडणुकीसाठी ग्रामपंचायत क्षेत्रातील नोकरदारांना भरपगारी सुटी देण्याचे आदेश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी जारी केले आहेत. सर्व मतदान केंद्रांसाठी आवश्यक तेवढे इव्हीएम तालुक्याच्या ठिकाणी सज्ज ठेवण्यात आले आहेत. मतदानाच्या एक दिवस आधी या मशीनींचे वितरण केले जाईल.

मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी संबंधित ग्रामपंचायतींच्या निवडणूक क्षेत्रातील सर्व दुकाने, निवासी हॉटेल्स, खाद्यगृहे, व्यापार, औद्यागिक उपक्रम तसेच इतर आस्थापना किंवा निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींच्या लगतच्या क्षेत्रातील औद्योगिक वसाहती तसेच महानगरपालिकेसारख्या मोठ्या नागरी वसाहतीच्या ठिकाणी नोकरीनिमित्त येणाऱ्या संबंधित ग्रामपंचायतीमधील कामगारांना पगारी सुटी देण्याचे आदेश लागू करण्यात आले असून मतदानाच्या दिवशी सर्वत्र कोरडा दिवस घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे त्या दिवशी ग्रामीण भागात मद्यविक्रीवरही बंदी घालण्यात आली आहे.

पाच गावांचे सरपंच, सदस्य अविरोध

जिल्ह्यातील 257 ग्रामपंचायतींपैकी चांदूर रेल्वे तालुक्यातील सावंगी संगम, नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील चिखली वैद्य, वरुड तालुक्यातील डवरगाव, मोर्शी तालुक्यातील बेलोना आणि दर्यापुर तालुक्यातील सांगवा बुजुर्ग या पाच गावांतील सरपंच व सदस्य अविरोध विजयी झाल्याने त्याठिकाणी प्रत्यक्ष निवडणूक होणार आहे. याशिवाय काही ग्रामपंचायतींमध्ये सरपंच अविरोध विजयी झाल्याने त्याठिकाणीदेखील त्या पदाची निवडणूक टळली आहे. परिणामी सार्वत्रिक मतदान हे 252 ग्रामपंचायतींमध्येच घेतले जात आहे.

बातम्या आणखी आहेत...