आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविधानपरिषदेच्या अमरावती विभाग मतदारसंघाची निवडणूक अगदी तोंडावर आली असतानाही महाविकास आघाडीमध्ये सामसूमच आहे. महाविकास आघाडीने अद्याप उमेदवार तर सोडा पण नेमका कोणता पक्ष निवडणूक लढणार हेही घोषित केले नाही. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या राज्यस्तरीय नेत्यांची मुंबईत बैठक होईल, असे पक्ष नेतृत्वाचे म्हणणे आहे. परंतु गेल्या दोन दिवसाआधीच होऊ घातलेल्या या बैठकीचा मुहूर्त अद्यापही ठरला नाही.
माजी गृह राज्यमंत्री भाजपचे डॉ. रणजीत पाटील यांचा कार्यकाळ आगामी 7 फेब्रुवारीला संपुष्टात येत असल्याने भारत निवडणूक आयोगाने येत्या 30 जानेवारीला ही निवडणूक घेण्याचे ठरविले आहे. उद्या, शुक्रवार, 5 जानेवारीपासून या निवडणुकीचे उमेदवारी अर्ज भरले जातील. परंतु महाविकास आघाडीने अजूनही पक्ष किंवा उमेदवार ठरविला नाही.
5 जागांसाठी निवडणूक
राज्यात नागपुर, औरंगाबाद व कोकण या तीन ठिकाणी शिक्षक आणि अमरावती, नाशिक या दोन ठिकाणी पदवीधर अशा पाच जागांसाठी विधान परिषदेची निवडणूक होत आहे. त्यामुळे सर्व मतदारसंघ सामोपचाराने लढले जावेत, असे महाविकास आघाडीच्या नेतृत्वाने ठरविले आहे.
बैठकीला मुहूर्त मिळाला नाही
त्यानुसार संयुक्त बैठक घेऊन आपापसात जागांची वाटणी व त्यानंतर उमेदवार निश्चिती असा क्रमही ठरविण्यात आला आहे. परंतु त्यासाठीच्या बैठकीला अद्यापही मुहूर्त मिळाला नाही. गेल्यावेळी अमरावती मतदारसंघ काँग्रेसने लढवला होता. त्यामुळे महाविकास आघाडीच्या बैठकीत यावेळीही प्रबळ दावेदारी नोंदविली जाईल. परंतु राज्यातील पाच मतदारसंघाची वाटणी करताना होणारा फेरबदल लक्षात घेता ही दावेदारी किती प्रभावी ठरते, हे येणारी वेळच ठरविणार आहे.
दरम्यान काँग्रेसच्या वाट्याला मतदारसंघ आल्यास माजी महापौर मिलींद चिमोटे आणि शिवसेनेच्या वाट्याला मतदारसंघ गेल्यास बुलडाण्याचे माजी जिल्हाप्रमुख धीरज लिंगाडे यांचे नाव उमेदवार म्हणून पुढे आले आहे.
महाविकासच्या बैठकीत होईल निर्णय
काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुनील देशमुख म्हणाले, राज्यातील पाचही मतदारसंघाच्या निवडणूक निमित्ताने महाविकास आघाडीच्या राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांची लवकरच बैठक होणार आहे. त्यामध्ये अमरावतीसह पाचही मतदारसंघ कुणी-कुणी लढावे, याबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाईल. त्यानंतर तो-तो पक्ष आपापला उमेदवार ठरवेल.
बैठकीची तारीख अद्याप अनिश्चित
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष संजय खोडके म्हणाले, विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्यातरी महाविकास आघाडीच्या बैठकीची तारीख ठरल्याचे माझ्या ऐकिवात नाही. मी सध्या मुंबईतच आहे. परंतु लवकरच ही बैठक होऊन त्यामध्ये पक्षनिहाय मतदारसंघांची विभागणी केली जाईल, हे खरे आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.