आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावती पदवीधर मतदारसंघ निवडणूक:मविआमध्ये अजूनही सामसूमच, ना बैठक, ना उमेदवार! पटोलेंचा 9 तारखेला दौरा

अमरावती21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने भाजपने उमेदवारी दाखल करण्यासाठी 11 जानेवारीचा मुहूर्त निश्चित केला असला तरी महाविकास आघाडीच्या गोटात अजूनही सामसूमच आहे. मविआ नेत्यांची मुंबईत होणारी बैठकही अद्याप झाली नाही. त्यामुळे मविआबद्दल बोलायचे झाल्यास सदर मतदारसंघाबाबत ना पक्ष ठरला ना उमेदवार अशी मविआची स्थिती आहे. दरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आगामी 9 जानेवारीला अमरावतीत येत आहेत. त्यावेळी कदाचित याबाबतचा निर्णय होईल, अशी शक्यता आहे.

येत्या 30 जानेवारीला राज्यातील 5 मतदारसंघात विधान परिषदेची निवडणूक होत आहे. या पार्श्वभूमीवर कोणत्या पक्षाने कोणता मतदारसंघ लढावा, हे मविआचे राज्यस्तरीय नेते आपसात ठरविणार होते. त्यासाठीची बैठक मुंबईत होणार असल्याचे तिन्ही पक्षाच्या स्थानिक प्रदेश पदाधिकाऱ्यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले होते. परंतु अद्याप ही बैठक झाली नाही. अमरावती पदवीधर मतदारसंघाबाबत बोलायचे झाल्यास गेल्यावेळी हा मतदारसंघ काँग्रेसने लढविला होता. त्यामुळे यावेळीही या पक्षाने दावा केला आहे. परंतु पाच मतदारसंघ व काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना असे तीन पक्ष (मविआचे घटक) एकत्र असल्याने त्यांच्यात मतदारसंघाची अदला-बदल होऊ शकते, अशी चर्चा आहे.

या पार्श्वभूमीवर भाजपच्या विरोधात या मतदारसंघात कोणत्या पक्षाचा उमेदवार असेल, हे अद्याप निश्चित झाले नाही. दरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आगामी सोमवार, 9 जानेवारी रोजी अमरावतीत येत आहेत. काँग्रेसने या निवडणुकीसाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी महापौर मिलींद चिमोटे यांच्या खांद्यावर मुख्य समन्वयकाची जबाबदारी दिली आहे. सोमवारी नेमकी बैठक कोठे होणार, हे अद्याप कळले नाही. परंतु प्रजासत्ताक दिनापासून सुरु होणाऱ्या काँग्रेसच्या ‘हात से हात जोडो’ अभियानासोबतच विधान परिषद निवडणुकीची चर्चाही त्या बैठकीत केली जाणार असल्याची माहिती आहे.

त्या दिवशी निर्णयाची शक्यता

काँग्रेस​​​ प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुनील देशमुख म्हणाले की, आगामी 9 जानेवारीला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले अमरावतीत येत आहेत. त्या दिवशी स्थानिक पातळीवर बैठक होईल. या बैठकीपूर्वीच कदाचित मविआ नेत्यांची मुंबईत बैठक होईल. त्यामुळे आगामी 9 तारखेच्या स्थानिक बैठकीतून काहीतरी निर्णय बाहेर पडेल, अशी आम्हाला आशा आहे.

बातम्या आणखी आहेत...