आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावती पदवीधर मतदारसंघ निवडणूक:100 टक्के मतदान, मतपत्रिका बाद होणार नाही, यावर जोर देणार - आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघाची मतदार नोंदणी तुलनेने कमी झाली, याला मतदारांचा निरुत्साह किंवा त्यांच्या स्वातंत्र्याचा भाग मानावा लागेल, हे स्पष्ट करीत असतानाच जेवढी नोंदणी झाली, त्यापैकी महत्तम मतदार मतदानाच्या प्रक्रियेत सहभागी होतील, यावर प्रशासन जोर देणार असल्याचे मत निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे व जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी स्पष्ट केले.

सदर निवडणुकीसाठी आज, गुरुवार, ५ जानेवारीपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली. या पार्श्वभूमीवर निवडणूक निर्णय अधिकारी या नात्याने विभागीय आयुक्त दिलीप पांढरपट्टे व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी माध्यमांशी संवाद साधला. दोन्ही अधिकाऱ्यांनी मतदार नोंदणी कमी होण्याला मतदारांचा निरुत्साह तथा तो त्यांच्या स्वैच्छीक अधिकाराचा मुद्दा असल्याचे स्पष्ट केले. त्यांच्यामते मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी कुणाला सक्ती करता येत नाही. परंतु पदवीधर झालेल्या सर्वांनीच मतदार नोंदणी करावी म्हणून प्रशासनाने पुरेपूर प्रयत्न केला. आयोगाच्या निर्देशानुसार स्थानिक पातळीवरही जनजागरण अभियान राबविले गेले. आम्ही स्वत: सायकल रॅलीद्वारे रस्त्यावर उतरुन आवाहन केले.

या निवडणुकीसाठी यावर्षी १ लाख ८५ हजार ९२५ मतदारांनी नोंदणी केली आहे. गेल्यावेळी २ लाख १० हजार ५११ मतदार होते. त्या तुलनेत यावेळची नोंदणी ही थो़डी कमी आहे. परंतु अजूनही मतदार नोंदणी सुरु असून १२ जानेवारी या शेवटच्या दिवसापर्यंत हा आकडा निश्चित वाढेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. सदर निवडणुकीसाठीचे मतदान ३० जानेवारीला सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळात होणार असून मतमोजणी २ फेब्रुवारीला होणार आहे. त्यादृष्टीने प्रशासनाकडून तयारी करण्यात आली असल्याचेही निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी स्पष्ट केले. त्याचवेळी शहरात बेकायदेशीरपणे झळकणारे झेंडे, बॅनर्स तत्काळ काढायला लावण्याचे आदेश दिल्याचे जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी सांगितले.

आयुक्त कार्यालयातील पत्रकार परिषदेला उपायुक्त संजय पवार, अजय लहाने, गजेंद्र बावणे व विजय भाकरे, सहायक आयुक्त श्यामकांत म्हस्के व विवेकानंद काळकर, तहसीलदार वैशाली पाथरे, निकिता जावरकर, रवी महाले, नायब तहसीलदार मधुकर धुळे तर जिल्हाधिकारी कार्यालयातील पत्रकार परिषदेला अतिरिक्त जिल्हाधिकारी राम सिद्धभट्टी, उपजिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे

आदी उपस्थित होते. पत्रकार परिषदेपूर्वी दोन्ही अधिकाऱ्यांनी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन त्यांना निवडणुकविषयक कामकाज, आचारसंहिता आदी बाबींची माहिती दिली.

बातम्या आणखी आहेत...