आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमरावती जिल्ह्यातील ७५ ग्रामपंचायतींमध्ये १८ मे रोजी पोट निवडणूक होऊ घातली आहे. याकरता स्वीकारण्यात आलेल्या उमेदवारी अर्जांची बुधवारी छाननी करण्यात आली. या प्रक्रियेत ७ उमेदवारी अर्ज अवैध ठरवण्यात आल्याने सदस्यपदांकरिता ११७ उमेदवार रिंगणात कायम आहेत. ८ मे रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असल्याने यातील किती उमेदवार माघार घेतात याकडे लक्ष लागले आहे. राज्य निवडणूक आयोगाने निधन, अनहर्ता किंवा अन्य कारणामुळे ग्रामपंचायतीतील रिक्त सदस्य व थेट सरपंचाच्या रिक्त जागांकरिता पोटनिवडणूक होत आहे. त्यामुळे २५ एप्रिल ते २ मे दरम्यान उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात आले. यामध्ये २ सरपंच पदांसाठी एक, तर ११४ सदस्यांकरिता १२४ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. याची छाननी बुधवारी करण्यात आली.
नामांकन अवैध
या प्रक्रियेत ७ नामांकन अवैध ठरले आहेत. यात चिखलदरा तालुक्यातील मेहरीआम, सोनापुर, टेंब्रुसोंडा येथील ३ उमेदवारी याशिवाय दर्यापूर तालुक्यातील चंडीकापूर, सासन ब्रु, अमरावती पिंपरी यादगिरे येथील उमेदवारी अर्ज अवैध ठरवण्यात आले आहे. याशिवाय तिवसा तालुक्यातील आखतवाडा ग्रामपंचायतींमध्ये सरपंच पदासाठी उमेदवारी अर्जच दाखल झाला नाही.
त्यामुळे या निवडणुकीनंतर पुन्हा काही जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे. सद्य:स्थितीत ११७ उमेदवार रिंगणात कायम आहेत. यासाठी ७५ ग्रामपंचायतींमध्ये गुरुवार १८ मे रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान होईल. दुसऱ्या दिवशी १९ मे रोजी मतमोजणी करून निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.