आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मेळघाट व्याघ्र प्रकल्पातंर्गत येणाऱ्या हरीसाल येथील वन परिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनी शासकीय निवासस्थानी गोळी झाडून आत्महत्या केल्याने खळबळ माजली आहे. अत्यंत धाडसी स्वभावाच्या चव्हाण यांनी आत्महत्या केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दीपाली चव्हाण आपल्या आईसोबत राहात होत्या.
मिळालेल्या माहितीनुसार गुरूवारी सकाळी 11 वाजताच्या सुमारास चव्हाण यांनी आईला गाडी करून देऊन बाहेरगावी पाठवले. गावाला गेल्यानंतर आईने फोन केला असता त्यांनी मोबाईल उचलला नाही. म्हणून त्यांच्या आईने शेजारील गार्डशी संपर्क साधून घरी जाऊन पाहायला सांगितले. गार्डने घरी जाऊन पाहिले असता त्या घरात पडलेल्या आढळल्या. त्यांच्या शेजारी पिस्तुल पडलेले होते. चव्हाण यांच्या आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट झालेले नसले तरी वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची चर्चा आहे. चव्हाण यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेली सुसाईड नोट पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.
दीपाली चव्हाण या धाडसी अधिकारी म्हणून ओळखल्या जात होत्या. त्यांच्या कार्यकाळात हरिसाल येथे पर्यटन विकसित झाले. दोन गावांचे पुनर्वसनही केले. मांगीया गावाच्या पुनर्वसनात काही गावकरी तिथून गेले नाही. त्यापैकी काहींनी त्यांच्या विरोधात अॅट्रासिटीचा गुन्हा दाखल केला होता. त्याचा त्यांनी धीराने सामना केला होता.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.