आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तापमान वाढ:अमरावतीत 15 वर्षांतील सर्वोच्च तापमान; 5 एप्रिलला पारा पोहोचला 44.1 अंश सेल्सिअसवर

अमरावती4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या सूर्य अक्षरश: आग ओकत आहे. सकाळी नऊ वाजेपासून अंगाला चटके बसेल एवढ्या प्रखर उन्हाचा तडाखा अमरावतीकर अनुभवत आहेत. सामान्यत: एप्रिलच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात अमरावतीत पारा ४४ अंशाच्या आसपास असतो. मात्र यंदा तर मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासूनच तापमानाचा पारा ४२ अंशाच्या वर पोहोचला. विशेष म्हणजे मंगळवारी (दि. ५) असलेले विक्रमी ४४.१ अंश तापमान हे मागील पंधरा वर्षांत आजच्या तारखेत कधीही नव्हते. या जीवघेण्या उन्हाने अमरावतीकर चिंतातूर झाले आहेत. कारण तीव्र उन्हाळ्याचे अजून दोन महिने बाकी आहेत.

विदर्भातील उन्हाळा म्हणजे प्रचंड त्रासदायक असतो. अमरावती, अकोला, चंद्रपूर या शहरांत तर सूर्य आग ओकत असतो. दरवर्षी एप्रिलच्या मध्यात किंवा अखेरीस असलेले तापमान यंदा पहिल्या आठवड्यातच अमरावतीकर अनुभवत आहेत. सकाळी साडेआठ ते नऊ वाजेपासून ऊन तापायला सुरूवात होत आहे. सद्य:स्थितीत उत्तर भारतात उष्णतेची लाट आहे. त्यामुळे त्या भागातून येणाऱ्या उष्ण वाऱ्यामुळे उष्णतामान जास्त असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.

पशुंची काळजी घ्या : तापमानात पशुधनाचे संरक्षण करण्यासाठी उपाययोजना कराव्यात. जनावरांना थंड व स्वच्छ पाण्याची व्यवस्था करावी. बैल व पशुधनाकडून सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेदरम्यान काम करणे टाळावे. गोठ्याच्या छतावर गवताचे आच्छादन करावे. शेड सिमेंट किंवा पत्र्याचे असल्यास पांढरा रंग द्यावा. आहारात हिरवा चारा, प्रथिनयुक्त, खनिज मिश्रण व मीठयुक्त खाद्य द्यावे. जनावरांना सकाळी किंवा संध्याकाळी चरावयास सोडावे. कुक्कुट पालन शेडमध्ये पडद्याचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

उष्णतेच्या लाटेमुळे आजारी पडलेल्या व्यक्तीचा उपचार
अशा व्यक्तीला एखाद्या थंड जागी ठेवा. शरीराचे तापमान खाली आणण्याचा प्रयत्न करा. ओल्या कपड्याने त्याला पुसत रहा. डोक्यावर थंड पाणी टाका. अशा व्यक्तीला ताबडतोब जवळच्या आरोग्य केंद्रात घेऊन जा. कारण उष्माघात घातक ठरू शकतो, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.

उष्माघातापासून बचावासाठी हे करावे
तीव्र उन्हात मुख्यत: दुपारी १२ ते ३ या दरम्यान बाहेर पडणे टाळावे, पुरेसे पाणी पित राहावे. शक्यतो हलक्या रंगाच्या सूती कपड्यांचा वापर करावा. गडद, घट्ट व जाड कपडे घालणे टाळावे. घराबाहेर पडताना छत्री, टोपी, गॉगलचा वापर करावा. मद्य, चहा, कॉफी, शीतपेये व शिळे अन्न खाणे टाळावे. उन्हात काम करत असताना चेहरा व डोके ओल्या कपड्याने झाकावे. बाहेर तापमान अधिक असल्यास शारिरीक श्रमाची कामे टाळावी. शेतकरी व शेतमजूर यांनी शेतात काम करताना पुरेसे पाणी प्यावे, तसेच प्रखर सूर्य प्रकाश असताना दुपारच्या वेळी काम करणे टाळावे. चक्कर येत असल्यास किंवा आजारी वाटल्यास त्वरित डॉक्टरकडे जावे. ओ. आर. एस., लस्सी, ताक, लिंबू पाणी इत्यादी घरगुती शीतपेयांचे भरपूर सेवन करावे. प्राण्यांना सावलीत ठेवून त्यांना भरपूर पाणी प्यायला द्यावे, असा सल्ला आरोग्य विभागाने दिला आहे.

उत्तर भारतातून येणाऱ्या उष्ण वाऱ्यामुळे वाढले तापमान
सध्या उत्तर भारतात उष्णतेची लाट असून त्याच भागातून वाहत येणाऱ्या उष्ण वाऱ्यामुळे आपल्या भागात तापमान वाढलेले आहे. आणखी चार ते पाच दिवस असेच तापमान कायम राहणार आहे.
प्रा. अनिल बंड, हवामान अभ्यासक, अमरावती.

बातम्या आणखी आहेत...