आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमरावती गरीब व गरजू रुग्णांसाठी राज्यात ठिकठिकाणी ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’चा डिजिटल अनावरण सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाला. अमरावती येथे चपराशीपुरा परिसरातील उर्दू विद्यालयात जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा, महानगरपालिका आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांच्या हस्ते आपला दवाखान्याचा शुभारंभ झाला.
राज्यात ३४२ ठिकाणी महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर आपला दवाखाना उपक्रमाचा प्रारंभ झाला. अमरावती येथील कार्यक्रमाला अतिरिक्त जिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी, सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी रिचर्ड यांथन, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद निरवणे,आदी मनपा कर्मचारी उपस्थित होते.
सुविधांचा मिळणार लाभ
आपला दवाखाना उपक्रमामुळे गोरगरीब, कष्टकरी, तसेच झोपडपट्टी भागात राहणाऱ्या नागरिकांना मोफत तपासणी, मोफत उपचार या आरोग्य सुविधांचा लाभ मिळणार आहे. प्रत्येक तालुक्यात एक दवाखाना उघडण्यात येत आहे. या दवाखान्यामुळे गोरगरिबांसाठी एक उत्तम आरोग्य सुविधा निर्माण झाली आहे, असे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी पंडा यांनी केले. या दवाखान्यात विविध आजारांवरील उपचारांसह डोळ्यांची तपासणी, मानसोपचार, लसीकरण, औषधोपचार अशा विविध सुविधा उपलब्ध असतील, अशी माहिती डॉ. ढोले यांनी दिली.
दवाखाने आधुनिक तंत्रज्ञानाने स्मार्ट बनविणे, सातत्यपूर्ण व गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा, विविध रोगांच्या प्रादुर्भावाचे निरीक्षण आणि नियंत्रण, सुलभ व परवडणारी दर्जेदार आरोग्य सेवा, शहरी भागातील गरीब रुग्णांसाठी सुविधा उपलब्ध राहणार आहे. तसेच बाह्य रुग्ण सेवा, मोफत औषधोपचार, मोफत तपासणी, टेली कन्सल्टेशन, महिन्यातून निश्चित दिवशी नेत्र तपासणी, एक्स-रे साठी संदर्भ सेवा, गर्भवती मातांची तपासणी, लसीकरण अशा सुविधा या केंद्रातून मिळणार आहे.
येथे वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, बहुउद्देशीय कर्मचारी, मदतनीस उपलब्ध राहणार आहेत. बाह्यरुग्ण सेवा दुपारी २.०० ते रात्री १०.०० वाजेपर्यंत राहणार आहे.या कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित होते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.