आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजगातील सर्वात सोपी गोष्ट कोणती असेल, तर ती म्हणजे अभ्यास करणे होय. अभ्यास केल्यास, चांगली मेहनत घेतल्यास हलाखीच्या परिस्थितीतही विद्यार्थी चांगल्या पदावर चांगला अधिकारी बनू शकतो. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने योग्य वयात अभ्यास करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक नितेश कराळे यांनी केले.
तुकडोजी महाराज यांची जन्मभूमी असलेल्या यावली शहीद येथील राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज अभ्यासिकेच्या द्वितीय वर्धापन दिनी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून नितेश कराळे, अमरावती येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्य मंगला देशमुख, विवेक गुल्हाने, अमोल बांबल, सरपंच स्नेहा यावलीकर, सुनील देशमुख, काशिनाथ जवने आदी मान्यवर उपस्थित होते.
या वेळी या अभ्यासिकेची संकल्पना मांडणार विद्यार्थी शेख वसीम शेख गमी हे अधिकारी पदावर रुजू झाल्याने त्यांचा सत्कार करण्यात आला. स्पर्धा परीक्षेविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना नितेश कराळे म्हणाले, विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असताना आपले व्याकरण आधी मजबूत केले पाहिजे. व्याकरणामध्ये विद्यार्थ्यांच्या अनेक चुका असतात. गणिताची माहिती असणे गरजेचे आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी हे आज मोठे अधिकारी झाले आहेत.
त्यामुळे विद्यार्थ्यांनी ग्रामीण आणि शहर असा भेदभाव मनात ठेवू नये, असेही कराळे पुढे बोलताना म्हणाले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मोबाइलचा वापर करणाऱ्या तरुणाईचे कानही या वेळी नितेश कराळे यांनी टोचले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज अभ्यासिकेचे संजय भोपळे, अमित लंगडे, प्रवीण वानखडे, पंकज वानखडे, भुषण लोंढे, अतुल वरघट, रोशन खवले, योगेश धर्माळे, विकेश खेरडे, निकेश नाईक, स्वप्निल वाघमारे, सुयोग पाटील, आकाश भुरे, सचिन वानखडे, हर्षल दिवटे, भक्ती चौधरी, प्रेरणा मडघे, प्रिती यावलीकर, मोहिनी भोजने आदींनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमास उपस्थित विद्यार्थ्यांशी कराळे यांनी खास आपल्या वऱ्हाडी भाषेत सं वाद साधून त्यांच्या अ़़डचणी समजून घेतल्या.
‘युपीएससी’ची अर्थात केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची मुलाखत ही एकूण २२ भाषेत देता येते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी भाषेची काळजी करू नये. आपल्याला अवगत असलेल्या आपल्याच बोली भाषेत मुलाखत दिली, तर आपली भाषा आणि विचार पोहोचवण्याचे ते माध्यम असल्याचेही कराळे या प्रसंगी म्हणाले. शासनाने मुलींच्या लग्नाचे वय २१ केल्यामुळे आता मुलींनाही अभ्यासासाठी वेळ मिळेल, असे ते पुढे बोलताना म्हणाले. आज समाजात मुली मुलांपेक्षा कोणत्याही क्षेत्रात कमी नाही. त्यामुळे पालकांनी मुला-मुलींत भेदभाव कदापिही करता कामा नये.
जीवनात आई-वडिलांना कधीच विसरता कामा नये
ज्या वयात मुला मुलींनी अभ्यास केला पाहिजे, त्या वयात तरुणाई महाविद्यालयात एकमेकांवर प्रेम करतात. त्यांनी प्रेमाकडे लक्ष न देता चांगला अभ्यास करावा. कारण महाविद्यालय जीवनातील हाच एक काळ असतो. की जेथे आपल्या जीवनाला वळण लागत असते.
आयुष्यात आपल्या आईवडिलांना कधीच विसरू नका. ते रक्ताचं पाणी करीत आणि पोटाला चिमटा घेवून मुलांना शिकवतात. आई-वडिलांनी आपल्यासाठी अनेक स्वप्ने बघितलेली असतात. त्यामुळे त्यांच्या स्वप्नांवर पाणी फेरू नका, असे आवाहनही नितेश कराळे यांनी या प्रसंगी विद्यार्थ्यांना केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.