आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक:डझनभर एपीएमसीच्या मतदार यादीची उद्या घोषणा अमरावतीच्या 414 अडत्यांच्या नावांकडे सर्वांचे लक्ष

अमरावती3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील १२ कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या (एपीएमसी) निवडणुकांसाठीची अंतिम मतदार यादी उद्या, सोमवार, २० मार्च रोजी घोषित होणार आहे. यापैकी अमरावती बाजार समितीतील अडत मतदारसंघाच्या यादीकडे सर्वांच्या नजरा खिळल्या असून त्या ४१४ नावांचे काय होणार, याबाबत अनेक तर्क-वितर्क लावण्यात येत आहेत.

अमरावती बाजार समितीमधील अडत मतदारसंघाच्या यादीत १ हजार ७० नावांचा समावेश आहे. यापैकी ४१४ नावे ही नियमित (दरवर्षी) नुतनीकरण न करणाऱ्या अडत्यांची असल्यामुळे त्यांच्या नावांवर इतरांनी आक्षेप घेतला होता. पुढे हा मुद्दा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपुर खंडपिठात गेला. दरम्यान न्यायालयाने संबंधित याचिका दाखल करुन घेत न्यायालयाच्या अंतिम निर्णयास अधीन राहून मतदार यादी घोषित करावी, असे सूचविले आहे. त्यामुळे उद्या घोषित होणाऱ्या यादीतील या नावांचे भवितव्य न्यायालयाच्या त्या अंतिम निर्णयावर अवलंबून राहणार आहे. सदर अडत्यांनी गेली दोन वर्षे आपापल्या दुकान/व्यवसायांच्या लायसन्सचे नुतनीकरण केले नाही. निवडणूक डोळ्यापुढे ठेऊन त्यांनी विलंब शुल्कासह तिन्ही वर्षांचे नुतनीकरण एकाचवेळी केले, असा काहींचा आक्षेप आहे. त्यामुळे त्यांची नावे मतदार यादीतून वगळली जावी, अशी मागणी संबंधितांनी केली होती.

जिल्ह्यातील दर्यापुर, अचलपुर, अमरावती, चांदूर रेल्वे, चांदूर बाजार, नांदगाव खंडेश्वर, मोर्शी, अंजनगाव सुर्जी, वरुड, धामणगाव रेल्वे, तिवसा आणि धारणी या बारा कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या संचालक मंडळांचा कार्यकाळ संपुष्टात आला आहे. त्यामुळे नजिकच्या काळात या सर्व बाजार समित्यांची निवडणूक होणार आहे.

मुळात या सर्व बाजार समित्यांचा निवडणूक कार्यक्रम यापूर्वीच घोषित झाला होता. परंतु गेल्या महिन्यात झालेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका आणि दरम्यानच्या काळात शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार देण्याबाबत शासनाने घेतलेली भूमिका यामुळे मतदार याद्या नव्याने तयार करण्याची वेळ ओढवली. त्यामुळे जुना निडवणूक कार्यक्रमही रद्द करण्यात आला. आता मतदार याद्या घोषित झाल्यानंतर नव्याने निवडणूक कार्यक्रम घोषित केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर उद्याच्या अंतिम मतदार यादीलाही महत्व प्राप्त झाले आहे.

या ठिकाणी केली जाणार घोषणा

बाजार समित्यांची अंतिम मतदार यादी कांतानगर स्थित जिल्हा उपनिबंधक कार्यालयासह संबंधित बाजार समित्यांच्या नोटीस बोर्डवर उपलब्ध करुन दिली जाणार आहे. अर्थात दर्यापुर, अचलपुर, अमरावती, चांदूर रेल्वे, चांदूर बाजार, नांदगाव खंडेश्वर, मोर्शी, अंजनगाव सुर्जी, वरुड, धामणगाव रेल्वे, तिवसा आणि धारणी या बारा कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या नोटीस बोर्डवरही तेथील नागरिकांच्या अवलोकनासाठी ती उपलब्ध असेल, असे सहकार विभागातर्फे सांगण्यात आले.