आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

10 महिन्यानंतर DNAमुळे फुटले खुनाचे बिंग!:मेळघाटच्या जंगलात आढळली होती मानवी कवटी, मारेकऱ्याला चिखलदरा पोलिसांकडून अटक

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मेळघाटातील खटकाली जंगल परिसरात आठ महिन्यांपुर्वी पोलिसांना एक मानवी कवटी सापडली होती. मात्र, त्यावरुन मृतकाची ओळख पटविणे शक्य नव्हते. दरम्यान हा मृतदेह एका महिलेचा असावा, असा संशय असल्यामुळे पोलिसांनी मृत महिलेच्या मुलाच्या नमुन्यासोबत त्या सांगाड्याच्या अवशेषाची ‘डिएनए’ चाचणी केली. त्यामध्ये ‘डिएनए’ चाचणी पॉझिटीव्ह आली. त्या आधारे चिखलदरा पोलिसांनी साेमवारी (दि. 2) महिलेच्या संपर्कातील एका 35 वर्षीय तरुणाला अटक केली.

मृत 42 वर्षीय महिला व अटक केलेल्या मारेकरी यांच्यात संबध होते, त्यामुळे घटनेपुर्वी महिला त्या तरुणाला लग्न कर, असे म्हणत होती. त्यातूनच तरुणाने हा खुन केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

अमोल विष्णू धर्मे (35, रा. अकोली जहागिर, अकोट) असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. 17 फेब्रुवारी 2022 पासून मृत 42 वर्षीय महिला घरुन बेपत्ता होती. तिच्या कुटूंबियांनी तीचा शोध घेतला तसेच बेपत्ता असल्याबाबत अकोट पोलिसात तक्रार दिली होती.

दरम्यान 9 एप्रिल 2022 रोजी चिखलदरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील खटकाळी जंगल भागात एक मानवी कवटी पोलिसांना आढळली होती. मात्र ती पुरूष कि महिलेची हे ओळखणे अशक्य होते. दरम्यान याबाबत चिखलदरा पोलिसांनी आजूबाजूच्या जिल्ह्यात त्याबाबत माहीती दिली होती. दरम्यान मृतक महिलेचे नातेवाईक पोलिसांपर्यंत पोहचले. सदर मृतदेह त्या महिलेचा असावा, असा संशय पोलिसांना आला. त्यामुळे चिखलदरा पोलिसांनी मृतक महिलेच्या मुलाच्या नमुन्यासोबत सापडलेल्या मानवी कवटीचे अवशेष ‘डिएनए’ चाचणी करण्यासाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे पाठवले होते.

दरम्यान नुकतेच डिएनए रिपोर्ट पोलिसांना प्राप्त झाले असून ते मुलासोबत जुळल्यामुळे ती कवटी मुलाच्या आईची असल्याचे समोर आले होते. या प्रकारानंतर महिलेचा मुलगा आणि नातेवाईक चिखलदरा पोलिस ठाण्यात पोहचले. त्यांनी पोलिसांना सांगितले कि, अमोल धर्मे आणि मृतक महिलेचे मागील काही वर्षांपासून संबध होते. त्यांचे एकमेकांसोबत फोनवर बोलने सुध्दा व्हायचे. मात्र घटनेच्या काही दिवसांपुर्वी अमोल व महिलेचा वाद झाला होता. कारण मृत महिला ही अमोलला लग्न करण्याबाबत म्हणत होती.

याच कारणावरुन अमोल धर्मेनेच हा खुन केल्याची तक्रार मृतक महिलेच्या 21 वर्षीय मुलाने चिखलदरा पोलिसात सोमवारी रात्री दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी अमोल धर्मेविरुद्ध खून करुन पुरावा नष्ट करणे कलमान्वये गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे. ही कारवाई चिखलदराचे ठाणेदार राहुल वाढवे व त्यांच्या पथकाने केली आहे.

बातम्या आणखी आहेत...