आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विश्लेषण:अनास्थेमुळे स्वच्छता सर्वेक्षणामध्ये अमरावती मनपा पडली पिछाडीवर

अमरावती2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील स्वच्छतेच्या एकूणच अनास्था त्यामुळे प्रदूषणात वाढ, दुर्गंधी कचऱ्यामुळे रोगराईत वाढ, निधीअभावी स्वच्छता कंत्राटदारांचे ४ महिन्यांपासून थकीत असलेले बिल, कंत्राटी स्वच्छता कर्मचाऱ्यांचे रखडलेले वेतन, त्यामुळे सफाईच्या कामातील उदासीनता, स्वच्छता कंत्राटदारांनी रोखलेले काम तसेच गेल्या ६ महिन्यांपासून प्रशासक राज आल्यानंतर स्वच्छता कर्मचाऱ्यांवर माजी नगरसेवकांचा न राहिलेला वचक, अशा एकूणच कारणांमुळे स्वच्छ भारत अभियानांतर्गत नुकत्याच जाहीर झालेल्या स्वच्छता सर्वेक्षण २०२२ मध्ये अमरावती महानगर पालिकेची क्रमवारी १८ व्या, तर राष्ट्रीय स्तरावर ८९ व्या स्थानापर्यंत माघारली आहे. मनपाला २०२१ मध्ये राज्यात दुसरे तर राष्ट्रीय स्तरावर ७ वे मानांकन मिळाले होते.

कचऱ्याबाबत सध्या शहरात सर्वत्र ओरड सुरू आहे. सर्वसामान्य नागरिकांपासून पर्यावरणतज्ज्ञ, राजकीय पक्ष सातत्याने टीकेची झोड उठवत आहेत. काही ठिकाणी कचरा उचलणारे कर्मचारीच पोहोचत नाहीत. काही ठिकाणी घंटागाड्या नियमित नाहीत. त्यामुळे कचऱ्याचे ढीग साचलेले दिसतात. तशीही गेल्या एका वर्षांत स्वच्छतेबाबत मनपाची कामगिरी फारशी चांगली राहिली नसल्याचे पर्यावरण तज्ज्ञांचे मत आहे.

स्वच्छ सर्वेक्षणात मनपाला ४२५२.५७ गुण
स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ सर्वेक्षण २०२२ मध्ये देशातील एकूण ४३५५ शहरांचा सहभाग होता. अमरावती मनपाला ६००० पैकी यावेण्ी ४२५२.५७ गुण मिळाले. त्यामुळे राष्ट्रीय स्तरावर ८९ तर राज्य स्तरावर १८ वे मानांकन मिळाले. सेवा स्तरावरील प्रगतीसाठी ३००० पैकी १८९७.६७, प्रामाणिकपणासाठी १८०० पैकी ६०० गुण, नागरिकांचा सहभाग व प्रत्यक्ष निरीक्षण यात २२५० पेकी १७५४.९० असे एकूण ४२५२.५७ गुण मिळाले आहेत.

तूर्तास एका महिन्याचे बिल चुकते करणार
दिवाळीच्या आधी कंत्राटदारांना अडचण जाऊ नये म्हणून निधीच्या उपलब्धतेनुसार तूर्तास एक महिन्याचे बिल चुकते केले जाईल. त्यानंतर जसा निधी प्राप्त होईल, त्यानुसार टप्प्याटप्प्याने बिल चुकते करणार. -डाॅ.प्रवीण आष्टीकर, आयुक्त, मनपा.

वाहनात इंधन भरण्यासाठी पैसे कुठून आणणार?
कर्मचाऱ्यांचे वेतन, तसेच घंटागाडी, कचरा कंपोस्ट डेपोपर्यंत उचलून नेणाऱ्या ट्रकचे दररोज इंधन भरावे लागते. यासाठी पैसे लागतात. त्याशिवाय गाड्या चालणार नाहीत. आता तर आमच्याकडे इंधनासाठी पैसे उरले नाहीत. इंधन भरण्यासाठी पैसे कुठून आणायचे अशी सध्या स्थिती आहे. -अमरावती कचरा कंत्राटदार.

कचरा उचलण्याच्या प्रक्रियेत मरगळ आली

कचरा उचलण्याच्या प्रक्रियेत गेल्या काही महिन्यांत मरगळ आली आहे. कचऱ्याची अनियमित उचल होत नसून सर्वत्र ढिगारे दिसतात. पावसात तर हा कचरा कुजून त्यामुळे दुर्गंधी पसरली होती. हीच बाब रोगराई वाढण्यासाठी कारणीभूत आहे. याचा साहजिकच पर्यावरणावर ही विपरित परिणाम होत आहे. प्रदुषण वाढत आहे. -जयंत वडतकर, पर्यावरण तज्ज्ञ, अमरावती.

बातम्या आणखी आहेत...