आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामैत्री तोडल्याचा राग धरून मित्राने चाकूने वार करून दुसऱ्या मित्राची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. अमरावती जिल्ह्यातील लोणी येथे गुरुवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेनंतर पोलिसांनी मित्र बळीराम चंदुलाल पवार (वय 25) याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
धीरज मुरलीधर गायबोले व बळीराम चंदुलाल पवार हे एकाच गावातील रहिवासी असून लहानपणापासूनचे मित्र होते. दरम्यान स्वभाव न आवडल्याने व वर्तणुकीत बदल झाला म्हणून त्याने सहा महिन्याअगोदर अचानक मैत्री तोडली. बळीरामशी बोलणे बंद केले. त्याने असे का केले, केवळ या कारणास्तव बळीरामने धीरज याचा चाकूने वार करत खून केला.
शरीरावर चाकूचे वार
दोघेही गुरुवारी सकाळी ते वेगवेगळ्या कामाने गावातील चौकात आले. याठिकाणी महाजन यांचे दुकान आहे. या दुकानासमोरच बळीरामने धीरजच्या शरीरावर चाकूने सपासप वार करुन त्याला ठार केले. या घटनेनंतर नागरिकांची धावाधाव झाली. धीरजला लगेच दवाखान्यात नेण्यात आले. परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. धीरजच्या पोटावर व गळ्यावर खोलवर घाव होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
गुन्हा दाखल
या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. दरम्यान बळीराम चंदुलाल पवार याला अटक करुन त्याच्याविरुध्द भारतीय दंड विधानच्या कलम 302 नुसार व अँट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोणीचे ठाणेदार मिलिंदकुमार धवणे यांनी घटनास्थळ गाठून या हत्येचा पंचनामा केला आहे. दरम्यान त्यांच्याच मार्गदर्शनाखाली लोणी पोलिस पुढील तपास करीत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.