आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

क्राइम:मूलबाळ होत नसल्याचे हिणवून घातला वाद; जाब विचारल्यानंतर 2 महिलांनी चुलतभावाचा केला खून

अमरावती10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • हमालपुरा परिसरातील घटना; राजापेठ पोलिसांनी केली मारेकऱ्यासह २ महिलांना अटक

राजापेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील हमालपुरा परिसरात आजूबाजूनेच घर असलेल्या दोन चुलत भावांमध्ये शनिवारी (दि.१३) रात्री वाद झाला होता. दरम्यान रविवारी (दि. १४) सकाळी चुलत भावाच्या घरी जाऊन ‘मला मूलबाळ नसल्यामुळे तू माझी बदनामी का करतोय’, मला का हिणवतोस, अशी विचारणा करणाऱ्या ३८ वर्षीय तरुणावर चुलत भावासह दोन महिलांनी लोखंडी बत्ता, चाकूने वार करुन जीवानिशी संपवले. ही घटना रविवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास घडली असून, पोलिसांनी या प्रकरणात मारेकऱ्यासह त्याची आई व अन्य एक महिला अशा तिघांना अटक केली आहे.

कैलाश गणेश अजबे (३८, रा. चिचफैल, हमालपुरा) असे मृतकाचे नाव आहे. या प्रकरणात पोलिसांनी सुनील माणिक अजबे (३६ रा. चिचफैल, हमालपुरा), सुनीलची आई व एक ३२ वर्षीय महिला या तिघांना अटक केली आहे. कैलाश आणि सुनिल हे दोघे नात्याने चुलत भाऊ असून त्यांची घर एकाच परिसरात आहे. मागील काही दिवसांपासून या दोघांमध्ये वाद सुरू होते. सुनील काही महिन्यांपासून एका महिलेसोबत ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये असून, त्याच्या आईसह ती महिला हे तिघे एकत्र राहतात. कैलाशचे काही वर्षांपूर्वी लग्न झाले आहे. मात्र, त्याला मूलबाळ झाले नाही. दरम्यान सुनील आणि कैलाशचा वाद झाला त्यावेळी दोघेही एकमेकांना शिवीगाळ करत होते.

सुनील कैलाशला म्हणाला की, तुझे इतक्या वर्षांपासून लग्न झाले तरीही तुला मूलबाळ नाही. तसेच इतरही काही आक्षेपार्ह शब्द सुनीलने वापरले होते. याच कारणावरून शनिवारी रात्रीसुद्धा त्यांच्यात भांडण झाले होते. दरम्यान, रविवारी सकाळी कैलाश सुनीलच्या घरी गेला आणि तू माझी का बदनामी करतो आहे, असा जाब विचारला. याच कारणावरून त्यांचा पुन्हा वाद झाला. त्यावेळी कैलाशला सुनील, त्याची आई व ती महिला या तिघांनी मारहाण केली. या मारहाणीत महिलांपैकी एकीने बत्ता त्याच्या डोक्यात मारला. एकीने काडीने मारले. याचवेळी सुनीलने चाकूने कैलाशच्या छातीत चाकूने वार केला आणि कैलाश घटनास्थळी रक्तबंबाळ अवस्थेत खाली पडला. त्यावेळी डोक्यात बसलेला बत्त्याचा जबर घाव आणि छातीत चाकूचा वार यामुळे कैलाश मृत झाला.

घटनेची माहिती मिळताच राजापेठचे ठाणेदार मनीष ठाकरे त्यांच्या पथकासह घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी घटनास्थळावरून बत्ता तसेच काठी जप्त केली आणि मारेकऱ्यांचा शोध सुरू केला. काही वेळातच पोलिसांनी सुनील अजबेसह त्याची आई व एका महिलेला अटक केली आहे. ही कारवाई राजापेठचे ठाणेदार मनीष ठाकरे, पोलिस निरीक्षक किशोर शेळके, पीएसआय काठेवाड, राजेश पाटील, किशोर महाजन, दिपक, अतुल संभे, विजय राऊत, शेख दानिश, राहुल ढेंगेकर, अमोल खंडेझोड यांनी केली आहे.

खून केल्यानंतर चाकू टाकला विहिरीत

सुनीलने ज्या चाकूने कैलाशचा खून केला तो चाकू त्याने खून केल्यानंतर घराच्या परिसरात असलेल्या एका सार्वजनिक विहिरीत टाकला आहे. त्यामुळे आता पोलिसांना तो विहिरीतून जप्त करावा लागणार आहे.

जाब विचारण्यासाठी गेला होता सुनीलच्या घरी

कैलाश हा रविवारी सकाळी सुनीलच्या घरी जाऊन मला मूलबाळ होत नाही, म्हणून तू माझी बदनामी का करतो, याबाबत जाब विचारण्यासाठी गेला होता. तसेच यांच्यात शनिवारी रात्रीसुद्धा वाद झाला होता. यातून कैलाशचा सुनील व दोन महिलांनी खून केला आहे. त्या तिघांनाही अटक केली आहे.- मनीष ठाकरे, ठाणेदार, राजापेठ.