आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावतीत चोरट्यांचा धुमाकूळ:शेतकऱ्याने स्प्रिंकलर पाइप चोरणाऱ्या दोघांना पकडून केले पोलिसांच्या हवाली

अमरावती2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेतातून शेती साहित्य चोरी होण्याचे प्रमाण वाढले आहे. अशातच आज पोलिसांऐवजी शेतकऱ्यांनीच स्प्रिंकलर पाईप चोरट्यांना पकडून पोलिसांच्या हवाली केले. तिवसा येथील एका शेतशिवारात ही घटना घडली आहे. संबंधित प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली. तर तिसरा फरार झाला आहे.

पोलिस आणि प्रत्यक्षदर्शी नागरिकांच्या कथनानुसार सुरेश निळे यांचे शेतात कापसाचे पीक असून त्यांच्या पिकाला ओलीत करण्यासाठी त्यांनी शेतात स्प्रिंकलर पाईप लावले आहेत. आज सकाळी ते शेतात गेले असता त्यांना 9 नग स्प्रिंकलर पाईप आढळून आले नाहीत. तेवढ्यात त्यांनी शोध घेतला असता त्यांना आरोपी सुनील भगत, भीमा बुटले व कैलास कुरवाडे (रा. तिघेही आनंदवाडी, तिवसा) हे स्प्रिंकलर पाईप हातात घेऊन जाताना दिसले. त्यांनी तिघांनाही हटकले व लगेच तिवसा पोलिसांना माहिती दिली.

दरम्यान पोलिसांनी आरोपी सुनील भगत व भीमा बुटले यांना अटक करून त्यांच्यावर फिर्यादी निळे यांच्या तक्रारीवरून कलम 379, 34 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी दोन्ही आरोपींची कारागृहात रवानगी करण्यात आली असून तिसरा आरोपी हा घटनास्थळावरून फरार झाल्याने त्याचा तिवसा पोलीस कसून शोध घेत आहे.

जिल्हाभर शेती साहित्य चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या असून याबाबत पोलीस अधीक्षक यांनी चोरट्यांना पकडण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. परंतु तरीही स्थानिक पातळीवरच चोरीच्या घटना वाढतच आहेत. त्यामुळे चोरट्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी कृती कार्यक्रम आखणे गरजेचे असून अवैध धंद्यावर लगाम लावणे गरजेचे आहे. अन्यथा शेतकऱ्यांनाच पोलिसांची भूमिका बजावावी लागेल. अशा काही जागरुक नागरिकांच्या प्रतिक्रिया आहेत.

बातम्या आणखी आहेत...