आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पळसमंडळमध्ये भीषण पाणीटंचाई:गावकऱ्यांची पाण्याविना गैरसोय, निवेदन दिले, महिना उलटूनही परिस्थिती ‘जैसे थे’च

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
पाण्याच्या प्रतिक्षेत ताटकळत असलेल्या महिला व चिमुकले. - Divya Marathi
पाण्याच्या प्रतिक्षेत ताटकळत असलेल्या महिला व चिमुकले.

नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील पळसमंडळ येथे गेल्या महिन्याभरापासून भीषण पाणीटंचाई जाणवत आहे. गावकऱ्यांची पाण्याविणा गैरसोय होत असल्याने येथील सरपंचांनी पंचायत समिती व तहसील विभागाकडे पाणी टंचाई अंतर्गत पाणी समस्या सोडण्याकरिता निवेदन दिले होते, परंतु महिना उलटूनही परिस्थिती ‘जैसे थे’च असल्याचे पहायला मिळत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

तातडीने पाणी समस्या न सोडविल्यास पंचायत समिती समोर ग्रामस्थांना सोबत घेऊन उपोषणाला बण्याचा इशारा सरपंच मंगला मोरे यांनी दिला आहे.

दरवर्षी उन्हाळा लागताच पळसमंडळ येथील नागरिकांना पाणी टंचाईच्या समस्येला समोरे जावे लागते. त्याकरिता शासनाकडून दरवर्षी येथे विहीर अधिग्रहण करून तात्पुरती पाणी समस्या निकाली काढली जाते. गावाला दरवर्षी भेडसावणारी पाणी टंचाईची समस्या कायम स्वरुपी निकाली काढण्याकरिता ग्रामपंचायत प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत, परंतु एकाएकी ती समस्या निकाला निघणार नाही. त्याला काही कालावधी लागणार आहे.

जानेवारी महिन्याच्या सुरूवातीलाच पाणी टंचाईची समस्या जाणवू लागली. एक दिवसा आड येणारे गावातील वॉर्डावाॅर्डामधील नळ मात्र आता सहा ते सात दिवसांआड येत आहेत. परिणामी भर उन्हात नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. पाणी टंचाईपासून नागरिकांना दिलासा देवून त्यांना नियमीत पाणी देता यावे, यासाठी तातडीने विहिरीचे अधिग्रहण करण्याकरिता पंचायत समिती कार्यालय व तहसील कार्यालय येथे निवेदन ग्राम पंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिले.

संबंधित अधिकाऱ्यांना भेटून पाण्याची समस्या गंभीर आहे, तातडीने सोडवा अशी विनंती सुद्धा केली, परंतु महिना उलटूनही विहीर अधिग्रहण करण्याचे अद्यापही आदेश आले नाही. त्यामुळे पळसमंडळवासियांनी संताप व्यक्त केला आहे.

पाणी प्रश्न निकाली न निघाल्यास करू उपोषण

गावात जानेवारी महिन्यातच पाणी समस्या उद््भवल्यामुळे ते तातडीने निकाली निघाली. याकरिता २५ जानेवारी रोजी तहसीलदार व पंचायत समिती यांच्याकडे निवेदन दिले, परंतु महिना उलटून अद्याप पाणी प्रश्न निकाली निघाला नाही. तातडीने पाणी समस्या न सोडविल्यास पंचायत समिती समोर ग्रामस्थांना सोबत घेऊन उपोषण करणार.'' - मंगला मोरे, सरपंच, पळसमंडळ

वरिष्ठांकडे पाठवला आहे प्रस्ताव

''पळसमंडळ ग्रामपंचायतीकडून पाणी प्रश्न निकाली काढण्यासाठ निवेदन प्राप्त झाले आहे. गावातील पाण्याची समस्या सोडविण्यासाठी विहीर अधिग्रहणाच्या आदेशाकरिता वरिष्ठस्तरावर प्रस्ताव पाठवण्यात आलेला आहे.'' - पुरुषोत्तम भुसारी, तहसीलदार, नांदगाव खंडेश्वर.

बातम्या आणखी आहेत...