आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुलगुरू डॉ. प्रमोद येवलेंकडे अमरावती विद्यापीठाचा प्रभार:शनिवारी स्वीकारणार पदभार, डॉ. मालखेडेंच्या निधनानंतर आहे जागा रिक्त

अमरावती2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरुंचा अतिरिक्त प्रभार डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांचेकडे सोपविण्यात आला आहे. डॉ. दिलीप मालखेडे यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली होती.

डॉ. येवले यांच्या नावाचा आदेश आज, शुक्रवारी राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती भगत सिंह कोश्यारी यांनी जारी केला. दरम्यान डॉ. येवले हे उद्या, शनिवार, ४ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता प्रभारी कुलगुरू डॉ. विजयकुमार चौबे यांचेकडून पदभार स्वीकारतील, असे विद्यापीठ सूत्रांचे म्हणणे आहे.

डॉ. प्रमोद येवले यांनी यापूर्वी फार्मसी कॉऊन्सिल ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष, ऑल इंडिया कॉऊन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन फार्मास्युटिकल एज्युकेशन बोर्डाचे अध्यक्ष, अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, नवी दिल्लीच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य, महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ, वर्धाच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य, महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय विद्यापीठ, वर्धा कोर्टचे सदस्य, फार्मसी कॉऊन्सिल ऑफ इंडिया, नवी दिल्लीचे सदस्य, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अॅन्ड रिसर्च, रायबरेली (उत्तरप्रदेश) च्या बोर्ड ऑफ गव्हर्नन्सचे सदस्य तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू, कवि कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेकचे प्रभारी कुलगुरू आदी पदे भूषविली आहेत.

त्यांना संशोधन आणि अध्यापनाचा ३३ वर्षांचा अनुभव असून त्यांची तीन पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांना वीस वर्षाचा प्रशासकीय अनुभव असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली एकोणवीस संशोधकांना आचार्य पदवीने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांची चार पेटेन्ट फाईल झाली होती, त्यापैकी तीन पेटेन्टला मान्यता मिळाली आहे. त्यांचे अनेक संशोधन पेपर प्रकाशित झाले असून अनेक प्रोजेक्टसवरही त्यांनी काम केले आहे.

आठ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय व्यावसायिक संस्थांचे ते आजीवन सदस्य आहेत. मलेशिया, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, हाँगकाँग, नेपाळ, चायना, युरोप आदी देशांचा त्यांनी अभ्यासदौरा केला आहे. त्यांना विद्यापीठाच्या विविध प्राधिकारिणींवर काम करण्याचा प्रचंड अनुभव आहे. त्यांच्या निवडीबद्दल विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. विजयकुमार चौबे, कुलसचिव डॉ. तुषार देशमुख, विविध प्राधिकारिणींचे सदस्य, विद्यापीठातील प्रशासकीय व शैक्षणिक विभागप्रमुख, शिक्षक, अधिकारी व कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

बातम्या आणखी आहेत...