आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशातील 25 मॉडेल केंद्रांमध्ये अमरावतीला स्थान:अपंग जीवन विकास संस्थेच्या पुनर्वसन केंद्राचा समावेश

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

देशातील 516 जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्रांपैकी 25 जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्रांची मॉडेल केंद्र म्हणून निवड करण्यात आली आहे. यामध्ये येथील अपंग जीवन विकास संस्थेद्वारा संचालित केंद्राचा समावेश झाला आहे.

याविषयी जिल्हाधिकारी तथा जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्राच्या पदसिद्ध अध्यक्ष पवनीत कौर यांनी जिल्ह्यासाठी अभिमानास्पद बाब असल्याचे गौरवोद्गार काढले. त्याचवेळी दिव्यांग बांधवांसाठी असलेल्या विविध योजना अधिकाऱ्यांनी स्वतःला संवेदनशील ठेवून राबवाव्या, असे आवाहनही केले.

अपंग जीवन विकास संस्थेच्या अपंग पुनर्वसन केंद्रात (नवाथेनगर) दिव्यांग बांधवांना उपयुक्त साधनांचे वितरण आणि याच संस्थेच्या संत गाडगे महाराज विद्यालयातील विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा संयुक्त कार्यक्रम आज पार पडला. यावेळी कार्यक्रमाध्यक्ष म्हणून जिल्हाधिकारी बोलत होत्या. प्रमुख अतिथी म्हणून माजी पालकमंत्री डॉ. सुनील देशमुख, जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी राजेंद्र जाधवर, अपंग जीवन विकास संस्थेचे अध्यक्ष किशोर बोरकर, प्राचार्य सुभाष गवई, माजी कुलगुरू डॉ. गणेश पाटील, डॉ. बी. आर. देशमुख, डॉ. दिनेश गवळी आदी मान्यवर उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दिव्यांग बांधवांना तीन चाकी सायकल, श्रवण यंत्र व इतर साहित्याचे वितरण करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी यांनी दिव्यांग बांधवांशी संवादही साधला. त्यांची आस्थेवाईकपणे चौकशी करित अडचणीही जाणून घेतल्या. कार्यक्रमादरम्यान गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. त्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र, सन्मान चिन्ह व पुष्पगुच्छ देण्यात आले.

दिव्यांग बांधवांचा दुःख दिव्यांगच समजू शकतो. किशोर बोरकर यांनी दिव्यांगांसाठी स्वतःला वाहून घेतले आहे. त्यांच्या या कार्यामुळेच राज्यातील एकमेव मॉडेल म्हणून या केंद्राचा समावेश झाला. दिव्यांगांसाठी काही देणे लागते या अर्थाने ते सतत त्यांच्यासाठी कार्यरत आहेत. प्रशासनाने तसेच समाजानेही किशोर बोरकर यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन माजी पालकमंत्री डॉ. सुनील देशमुख यांनी केले. यावेळी प्रा. सुभाष गवई व राजेंद्र जाधवर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

प्रास्ताविक किशोर बोरकर यांनी केले. विविध शासकीय विभागात दिव्यांगांची सेवा भरती बंद आहे. दिव्यांग बांधवांच्या नोकरीचा अनुशेष भरण्यात यावा, अशी मागणी यावेळी किशोर बोरकर यांनी रेटली. संचालन माजी प्राचार्य वसुंधरा चवरे यांनी केले. तर आभार प्रकल्प संचालक आर. एस. कोंडे यांनी मानले. समारंभाला साची फाउंडेशनचे अध्यक्ष जगदीश गोवर्धन, प्रा. अनिल देशमुख, राजाभाऊ चौधरी, दिनेश खोडके, भैय्या निचळ, आशा अघम, अनिला काजी, मुख्याध्यापक किशोर बनसोड, प्रमोद दानखडे, अभिषेक अलकरी, साधना राऊत, सविता राठोड, भाग्यश्री रामेकर यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...