आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएनसीएपी (नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम) अंतर्गत घेण्यात आलेल्या स्वच्छ वायू सर्वेक्षण 2022-23 स्पर्धेत 3 ते 10 लाख लोकसंख्येच्या गटात अमरावती शहराने 200 पैकी 165 गुण मिळवून देशातून तिसरा क्रमांक पटकावला आहे. यासाठी अमरावती महानगर पालिकेला 25 लाख रुपयांचा पुरस्कारही घोषित झाला आहे. हा पुरस्कार पटकावणारे अमरावती हे राज्यातील एकमेव शहर आहे.
स्वच्छ वायू सर्वेक्षणांतर्गत हवा शुद्ध ठेवण्यासाठी उत्कृष्ट प्रयत्न करणाऱ्या शहरांमध्ये केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळाने गोळा केलेल्या आकडेवारीनुसार केंद्र सरकारच्या पर्यावरण, वने व जलवायू परिवर्तन मंत्रालयाने पुरस्काराची घोषणा केली. यासंदर्भातील पत्र पर्यावरण, वने व जलवायू परिवर्तन मंत्रालयाचे अप्पर सचिव नरेशपाल गंगवार यांच्याकडून अमरावती महापालिकेला मिळाले आहे.
महापालिकेद्वारे एनसीएपी अंतर्गत आतापर्यंत केलेल्या उत्तम कामगिरीचाच हा परिणाम असल्याची प्रतिक्रिया मनपा आयुक्त डाॅ. प्रवीण आष्टीकर यांनी दिली. 3 डिसेंबर रोजी पर्यावरण, वने व जलवायू परिवर्तन मंत्री भूपेंद्र यादव यांच्या हस्ते भुवनेश्वर येथे अमरावती मनपाला पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. या पुरस्कारामुळे मनपाला भविष्यात पर्यावरण संवर्धनासाठी आणखी चांगली कामगिरी करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल, असेही डाॅ. आष्टीकर यांनी सांगितले.
देशातील 131 शहरांना पर्यावरण मंत्रालयाद्वारे स्वयं मुल्यांकन अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले होते. त्यापैकी 123 शहरांनी त्यांचा स्वयं मुल्यांकन अहवाल सादर केला. त्यानंतर केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने हा अहवाल योग्य की अयोग्य याबाबत तपासणी केली. त्यांनी पाठविलेल्या निष्कर्षाच्या आधारे देशातील 9 शहरांना स्वच्छ हवेसाठी पुरस्कार प्रदान करण्यात आले.
तीन ते दहा लाख लोकसंख्येच्या गटात मोरादाबादने पहिला, फिरोझाबादने दुसरा तर अमरावतीने तिसरा क्रमांक पटकावला. 10 लाखांवरील लोकसंख्येच्या गटात लखनौ शहराने 177.6. गुणांसह पहिला क्रमांक पटकावला. तर 3 लाखांवरील लोकसंख्येच्या गटात देवासने 167 गुण पटकावले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.