आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविविध कारणांनी रिक्त झालेल्या ग्राम पंचायत सदस्य व सरपंच पदांसाठी राज्य निवडणूक आयोगाने पोटनिवडणूक घोषित केली असून येत्या १८ मे रोजी त्यासाठी मतदान होत आहे. परंतु प्रत्यक्षात ही पोटनिवडणूक फसली असून निम्म्या जागांसाठी उमेदवार न मिळाल्यामुळे पुन्हा एकदा निवडणूक घेण्याची वेळ राज्य निवडणूक आयोगावर ओढवली आहे.
जिल्ह्यातील ७५ ग्रामपंचायतींमधील दोन सरपंच आणि ११२ सदस्य अशा एकूण ११४ जागांसाठी पोटनिवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. यापैकी ३३ जागा अविरोध विजयी झाल्या असून ३१ जागांसाठी आगामी १८ मे रोजी मतदान घेतले जात आहे. अशाप्रकारे ६४ जागांसाठीच निवडणूक होत असून उर्वरित ५० जागा रिक्त आहेत.
या ५० जागा ४७ ग्रामपंचायतींशी निगडित असल्याने तेथे पुन्हा एकदा निवडणूक घ्यावी लागणार आहे. कार्यकाळ संपण्यापूर्वीच सदस्याचे निधन, कर न भरणे किंवा जात पडताळणी प्रमाणपत्र सादर न करणे अथवा सरकारी जागेवर अतिक्रमण आदी तत्सम कारणांमुळे सदस्यत्व गमावल्याने जिल्ह्यातील दोन सरपंच व ११२ सदस्यांच्या जागा रिक्त झाल्या आहेत. या जागांसाठी राज्य निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीची घोषणा केली आहे. परंतु ५० जागांसाठी उमेदवारच न मिळाल्यामुळे ही पोटनिवडणूक पुन्हा एकदा घ्यावी लागेल, असे महसूल प्रशासनातील निवडणूक विभागाचे म्हणणे आहे.
यातील जमेची बाजू म्हणजे ६४ जागांसाठी प्रत्यक्ष निवडणूक होत असून त्यापैकी एका सरपंचासह थेट ३३ सदस्यांसाठी केवळ एकेकच अर्ज प्राप्त झाला आहे. त्यामुळे तेथील निवडणूक अविरोध झाली असून महसूल प्रशासनाला तेवढाच दिलासा मिळाला आहे.
दरम्यान येत्या १८ मे रोजी होणारे मतदान आणि त्यानंतरच्या दुसऱ्या दिवशी अर्थात १९ मे रोजी होणारी मतमोजणी यासाठी महसूल प्रशासन कामाला लागले असून इव्हीएमचे वितरण, मतपत्रिकांची इव्हीएममध्ये बांधणी, मतदान व मतमोजणी केंद्रांची आखणी आदी बाबींमध्ये महसूलचे तीनशेहून अधिक अधिकारी-कर्मचारी व्यग्र झाले आहेत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.