आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबदलीसाठी आजारपणाचा बनाव करणाऱ्यांची संख्या वाढीस लागल्याने जिल्हा परिषद प्रशासन कठोर झाले असून तब्बल ४२२ शिक्षकांच्या वैद्यकीय प्रमाणपत्रांची पडताळणी करण्याचे आदेश देण्यात आले आहे. जिल्हा परिषदेचे सीईओ यांनी हे आदेश जारी केले असून त्यासाठी १५ मे पर्यंतची मुदत देण्यात आली आहे.
सध्या जिल्हा परिषदेत बदल्यांचा मोसम आहे. वेगवेगळ्या संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या जात आहेत. या क्रमात शिक्षकांच्याही बदल्यांचे वेळापत्रक फार पूर्वीच घोषित झाले असून त्यानुसार अनेकांनी ऑनलाईन अर्ज सादर केले आहेत. बदल्यांमध्ये अंध-अपंग-आजारी संवर्गाला प्राधान्य असल्याने बहुतेक शिक्षकांनी या संवर्गाचा आधार घेतला आहे. परंतु आश्चर्याची बाब अशी की यामधील बहुतेक दस्तऐवज बनावट असल्याची चर्चा आहे. त्यामुळेच सीईओ अविश्यांत पंडा यांनी हा कठोर निर्णय घेतला असून बदलीसाठी आजारपणाचे प्रमाणपत्र जोडणाऱ्यांना त्यांच्या प्रमाणपत्राची पडताळणी करुन आणण्याचे संदेश पाठविले आहे.
अमरावती विभागासाठी यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात वैद्यकीय मंडळ आहे. या मंडळात सर्व प्रकारचे तज्ज्ञ डॉक्टर्स असल्याने त्यांच्या माध्यमातून केली जाणारी पडताळणी ही अंतीम व खरी चाचणी समजली जाते. त्यामुळे स्वत: अथवा कुटुंबीयांच्या आजारपणाची सबब पुढे करुन बदली मागितलेल्या शिक्षकांनी त्यांनी सादर केलेल्या वैद्यकीय प्रमाणपत्रांची पडताळणी करुन आणावी, असे सीईओंचे आदेश आहेत. या आदेशानुसार शिक्षणाधिकारी प्रिया देशमुख यांनी बदली मागणाऱ्या संबंधित शिक्षकांना तशी पत्रे धाडली असून वैद्यकीय मंडळाकडून प्रमाणपत्रे पडताळून घ्यावीत, अशी सूचना केली आहे. त्यासाठी आगामी १५ मे पर्यंतची मुदत देण्यात आली असून या कालावधीत किती जण तशी प्रमाणपत्रे सादर करतात, यावरुन खरे-खोटे कारण सांगणाऱ्यांची संख्याही स्पष्ट होणार आहे.
आजारपणाचे प्रमाणपत्र जोडणाऱ्यांमध्ये सर्वाधिक १८२ ही संख्या अस्थीव्यंगांची आहेत. त्याखालोखाल ८६ ही संख्या हृदयरुग्णांची आहे. त्यापैकी ५८ जणांना येत्या काळात हृदय शल्यक्रिया करावी लागणार असून २८ शिक्षकांची हृदय शल्यक्रिया झाली आहे. ३१ शिक्षक हे मेंदूशी संबंधित आजाराने ग्रस्त आहेत तर १८ शिक्षकांना कर्करोगाने ग्रासले असून १३ शिक्षकांना पक्षाघात झाला आहे. ८ जणांना किडनीचा त्रास असून एक शिक्षक थेलेसीमीयाग्रस्त आहे. या सर्व शिक्षकांना त्यांनी सादर केलेली प्रमाणपत्रे पडताळून आणण्याचे आदेशदेण्यात आले आहेत.
७६० शिक्षक ५३ वर्षांवरील
नियमानुसार ५३ वर्षांहून अधिक वय असलेल्यांनाही बदलीसाठी प्राधान्य मिळते. अशा शिक्षकांची संख्या ७६० आहे. तर विधवा असलेल्या शिक्षिकांची संख्या १०२ असून बदलीसाठी त्यांनीही ऑनलाईन अर्ज सादर केले आहेत. सैन्य दलातील निवृत्तांचे नातेवाईक या संवर्गातील १३ शिक्षकांनीही त्यांना लागू असलेल्या तरतुदींच्या अनुषंगाने बदलीची मागणी केली आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.