आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासंत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या अधीसभेतून (सिनेट) व्यवस्थापन परिषदेवर (मॅनेजमेंट कौन्सिल) निवडून द्यावयाच्या आठ जागांपैकी तीन जागांवर नागपूर युनिव्हर्सिटी टिचर्स असोसीएशन अर्थात ‘नुटा’ ने बिनविरोध विजय मिळवला आहे.
उर्वरित जागांचा फैसला आगामी १० फेब्रुवारीच्या सिनेट बैठकीत होणार आहे. राज्यपालांच्या परवानगीनंतर सिनेटची पहिली बैठक होत आहे. या बैठकीतच ही निवड घोषित केली जाईल. तसे पत्र सर्व सिनेट सदस्यांना देण्यात आले आहे.
ST संवर्गाची जागा रिक्त
विजयी उमेदवारांमध्ये भय्यासाहेब मेटकर, प्रा. हरिदास धुर्वे व डॉ. विजय नागरे यांचा समावेश आहे. मेटकर हे नोंदणीकृत पदवीधर मतदारसंघाच्या ओबीसी संवर्गातून तर, प्रा. धुर्वे हे याच मतदारसंघाच्या डीटी/एनटी संवर्गातून विजयी झाले आहेत. याशिवाय प्राचार्य मतदारसंघातील एका जागेवर विजय नांगरे विजयी झाले आहेत. याच मतदारसंघातून आणखी एका सदस्याला व्यवस्थापन परिषदेवर पाठवावयाचे होते. परंतु ती ज्या संवर्गासाठीची आहे, त्या ‘एसटी’ संवर्गाचा एकही उमेदवार विजयी न झाल्यामुळे ती रिक्त राहणार आहे.
उर्वरित 2 जागांवरही नुटाच बाजी मारणार
दोन प्राचार्य, दोन प्राध्यापक, शैक्षणिक संस्थांच्या व्यवस्थापन संवर्गातून विजयी झालेल्या सहा सदस्यांपैकी दोन प्रतिनिधी आणि दोन नोंदणीकृत पदवीधर असे हे आठ सदस्य असतील. सिनेट निवडणुकीत प्राचार्य, प्राध्यापक आणि नोंदणीकृत पदवीधर या प्रत्येक संवर्गातून प्रत्येकी १० सदस्य विजयी झाले आहेत. त्यापैकीच दोन निवडावयाचे असून प्रत्येक संवर्गातील एक सदस्य हा राखीव प्रवर्गातील असावा, असा नियम आहे. या निवडणुकीसाठी ३० जानेवारीपर्यंत नामांकन अर्ज मागविण्यात आले होते. वरिल तीन जागांवर प्रत्येकी एकेकच अर्ज प्राप्त झाल्याने मेटकर, धुर्वे व नांगरे यांच्या विजयाचा मार्ग त्याच दिवशी मोकळा झाला.
दरम्यान शैक्षणिक संस्थांच्या व्यवस्थापन संवर्गातून निवडावयाच्या दोन जागांपैकी नुटाने हर्षवर्धन देशमुख, प्राध्यापक संवर्गातून डॉ. प्रवीण रघुवंशी, प्राचार्य संवर्गातून आर. डी. सिकची आणि पदवीधर संवर्गातून अविनाश बोर्डे यांनी उमेदवारी दाखल केली आहे. इतर उमेदवारांसोबत त्यांना संघर्ष करावा लागत असला तरी एकूण बलाबल लक्षात घेता नुटाच बाजी मारेल, असे चित्र आहे.
प्रा. डॉ. मुंद्रे तक्रार निवारण समितीवर अविरोध
विद्यापीठातील विविध निर्णय, मुद्द्यांबाबत कधी-कधी तक्रारीही असतात. अशा तक्रारींची सोडवणूक करण्यासाठी एक तक्रार निवारण समिती गठित केली जाते. नियमानूसार या समितीवरही एका सिनेटरची आवश्यकता असते. त्यासाठी प्रा. डॉ. रवींद्र मुंद्रे यांची निवड करण्यात आली आहे. मुळात त्यांच्याशिवाय इतर कुणाचाही अर्ज प्राप्त झाला नव्हता. त्यामुळे तेही बिनविरोध विजयी झाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.